चार बछड्यांसह वाघिणीने केली शिकार, पर्यटकांनी अनुभवला थरार
By गेापाल लाजुरकर | Published: June 14, 2023 08:46 PM2023-06-14T20:46:10+5:302023-06-14T20:54:31+5:30
गुरवळा निसर्ग सफारीत गायीचा पाडला फडशा.
गडचिराेली : ताडाेबाच्या धर्तीवर गडचिराेली जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या गुरवळा निसर्ग सफारीत मंगळवार १३ जून राेजी सकाळ व सायंकाळच्या दाेन्ही फेऱ्यांमध्ये जी-१० वाघिणीसह बछड्यांचे दर्शन पर्यटकांना झाले. परंतु सायंकाळच्या फेरीत सहा गाड्यांमधील पर्यटकांना वाघीण व तिचे बछडे एका गायीची शिकार करतानाचा प्रत्यक्ष व थरारक अनुभव घेता आला.
विशेष म्हणजे, गुरवळा नेचर सफारीत गेल्या दाेन महिन्यांपासून पर्यटकांना सातत्याने वाघ, वाघिणीसह तिच्या बछड्यांचे दर्शन हाेत आहे.गडचिराेली जिल्हा मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या गुरवळा येथील नेचर सफारीत वाघ, बिबट्यासह अस्वल, तडस, रानकुत्रे व अन्य हिंस्त्र प्राणी आहेत. याशिवाय तृणभक्षी प्राणीसुद्धा आहेत. परंतु विशेष आकर्षण असलेले वाघ, बिबट व अस्वल पाहण्याकडे पर्यटकांचा कल असताे.
मंगळवार १३ जून राेजी सकाळी निसर्ग सफारीत पाच गाड्या साेडण्यात आल्या. पाचही गाड्यांमधील पर्यटकांना वाघीण व तिचे बछडे दिसले. याशिवाय अन्य वन्यप्राणी पर्यटकांना पाहता आले. तर सायंकाळच्या सफारीत पर्यटकांच्या सहा गाड्या समाविष्ट हाेत्या. तेथील पर्यटकांना वाघांचा वावर असलेल्या भागातून नेण्यात आले. यावेळी तेथे त्यांना वाघिण आपल्या चार बछड्यांसह एका गायीची शिकार करीत असल्याचे प्रत्यक्ष पाहता आले. विशेष म्हणजे, १० डिसेंबर २०२१ पासून आतापर्यंत ५२० वाहनात २ हजार २०० पर्यटकांनी भेट दिली.
सफारीत वाघांची संख्या किती ?
गुरवळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीअंतर्गत संचालित नेचर सफारीचे क्षेत्र ३ हजार ७३२.५३ हेक्टर आर जागेत विस्तारले आहे. ६० किमीचे रस्ते येथे तयार केले आहेत. सध्या सफारीच्या या जंगलात जी-१, जी-१६ हे नरवाघ वावरत असून, जी-१० ही वाघीणसुद्धा आपल्या ४ बछड्यांसह वावरत आहे.