तिमरम परिसर विकासापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:16 AM2018-07-15T00:16:58+5:302018-07-15T00:18:11+5:30
तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या झिमेला, तिमरम, गुड्डीगुडम परिसरात मूलभूत सोईसुविधा अद्यापही न पोहोचल्याने या भागाचा विकास रखडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या झिमेला, तिमरम, गुड्डीगुडम परिसरात मूलभूत सोईसुविधा अद्यापही न पोहोचल्याने या भागाचा विकास रखडला आहे. शासन, प्रशासनाचे येथील विकासाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांनी झिमेला येथे आयोजित चर्चासत्रात केला.
झिमेला परिसरातील मूलभूत सोयीसुविधांबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी कैलाश कोरेत व परिसरातील नागरिक उपस्थित होते. चर्चासत्रात नागरिकांनी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, सिंचन, मुख्य रस्ता, वीज पुरवठा तसेच वनहक्क, निराधार प्रकरणे आदी प्रलंबित समस्या मांडल्या. शासकीय योजनेचा लाभापासून शेकडो कुटुंबातील नागरिक वंचित असल्याचे सांगितले. दरवर्षी अविकसित दुर्गम क्षेत्रातील विकासाकरिता प्रचंड निधी खर्च केला जातो तरीही शेवटच्या घटकापर्यंत निधी कधीच पोहोचत नाही. केवळ कागदोपत्री वितरित होत असल्याचे अनुभव कित्येक ठिकाणी दिसून येतो, असा आरोपही नागरिकांनी चर्चासत्रात केला.