टिपागडचे अभयारण्य दुर्लक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:47 AM2021-06-16T04:47:53+5:302021-06-16T04:47:53+5:30
कुरखेडा : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे. या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची ...
कुरखेडा : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे. या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे, शिवाय येथील वन्यजिवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त
आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनीसेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने, या भागातील विविध कंपनीच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
गरजूंना भूखंड देण्याची मागणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्य रेषेमध्ये समावेश आहे. त्यामुळे या समाजातील नागरिकांना घर बांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
घोट-रेखेगाव मार्गाची दुरवस्था
घोट : परिसरातील घोट-रेखेगाव मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोट हे मोठे गाव असल्याने या गावाला रेखेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी येतात. हा मार्ग खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मार्गावर अनेक किरकोळ अपघात यापूर्वी घडले आहेत.
वननाक्यावर कर्मचाऱ्यांचा अभाव
गडचिरोली : तालुक्यातील नाक्यावर केवळ अपुरे कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत तीन पाळीमध्ये आपली जबाबदारी निभवावी लागत आहे. एका कर्मचाऱ्याला किमान १६ तास काम करावे लागत आहे.
याेजनांबाबत जनजागृतीचा अभाव
कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुका स्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.
पुलाला कठडे लावा
चामाेर्शी : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षण कठडे तुटले असून, काही चोरीलाही गेले आहेत.
राेजगाराअभावी बेरोजगारांमध्ये नैराश्य
देसाईगंज : परिसरात मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार असून, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहेत. त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी परिसरात उद्योगाची निर्मिती करावी, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे. काेराेनामुळे वर्षभरापासून भरती प्रक्रिया नसल्याने बेराेजगार थकले आहेत.
महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी
भामरागड : जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी, महा-ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले, तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे.