चार महिन्यांपासून मानधन थकीत
By Admin | Published: November 1, 2014 10:52 PM2014-11-01T22:52:52+5:302014-11-01T22:52:52+5:30
मागील चार महिन्यांपासून अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. त्याबरोबरच अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढही झाली नाही. त्यामुळे २१ नोव्हेंबरला अंगणवाडी
अंगणवाडी महिला आक्रमक : २१ नोव्हेंबरला दिल्लीवर देणार धडक
गडचिरोली : मागील चार महिन्यांपासून अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. त्याबरोबरच अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढही झाली नाही. त्यामुळे २१ नोव्हेंबरला अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्यावतीने दिल्ली येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
अंगणवाडी महिला केंद्र व राज्य सरकारच्यावतीने मानधन दिल्या जाते. अंगणवाडी सेविकेला ५ हजार तर मदतनीसला २ हजार ५०० रूपये दिले जात असले तरी गडचिरोली ज्ल्ह्यिातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. मागील चार महिन्यांपासून राज्य शासनाचे तर दोन महिन्यांपासून केंद्र शासनातर्फे दिले जाणारे वेतन थकीत आहे. दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर २१ आॅक्टोबरला गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनही करण्यात आले व आपल्या विविध मागण्यांची निवेदन महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल भडांगे यांना देण्यात आले. परंतु अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
एकात्मिक बालविकास योजनेचा प्रारंभ होऊन ४० वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. अंगणवाडी सेविका तसेच मदतनिस सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ देण्यात आला नाही. महाराष्ट्रातील २ लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एक महिन्याचा दीर्घकालीन संप केला होता. अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय ३० एप्रिल रोजी घेण्यात आला असला तरी सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे २१ नोव्हेंबरला दिल्ली येथे रामलिला मैदानावर आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी दिली. वेतनाच्या मुद्यावर अंगणवाडी कर्मचारी आक्रमक आहेत. (शहर प्रतिनिधी)