व्याघ्रदर्शनाने उडाला थरकाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:49 PM2018-11-22T23:49:43+5:302018-11-22T23:50:03+5:30
तालुक्यातील चांभार्डापासून तीन किमी अंतरावर असलेल्या जंगलात मागील तीन महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. या वाघाने गुराख्यांसह अनेकांना दर्शनही दिले आहे. परंतु मंगळवारी रात्री ९ वाजता चांभार्डापासून अडीच किमी अंतरावर असलेल्या मरेगाव पूलावर वाघाने ठिया मांडला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील चांभार्डापासून तीन किमी अंतरावर असलेल्या जंगलात मागील तीन महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. या वाघाने गुराख्यांसह अनेकांना दर्शनही दिले आहे. परंतु मंगळवारी रात्री ९ वाजता चांभार्डापासून अडीच किमी अंतरावर असलेल्या मरेगाव पूलावर वाघाने ठिया मांडला होता. या वाघाच्या दर्शनाने चांभार्डा येथील तीन युवकांचा थरकाप उडाला.
मंगळवारी रात्री मरेगावमार्गाने देसाईगंज येथील व्यक्ती दुचाकीने वडधाकडे जात होता. त्याला मरेगावनजीकच्या पाल नदीच्या लहान पुलावर वाघ बसून असल्याचे दिसून आले. त्याने दुचाकीचा मार्ग पुन्हा मरेगावकडे वळविला. मरेगावकडे येत असताना त्याला चांभार्डा येथील कैैलास कोरेवार हा युवक दुचाकीने येत असताना दिसला. दुचाकीस्वाराने कैैलास कोरेवार यांना थांबवून समोर पुलावर वाघ बसून असल्याचे सांगितले. व तो मरेगाव-अमिर्झा मार्गे देसाईगंजकडे निघाला. कोरेवार यांनी काही काळ रस्त्यावर दुचाकी थांबविली. व त्यानंतर चांभार्डा येथील अनंता जम्बेवार व विनायक लाजूरकर हे दुचाकीने येताना दिसले. कैैलासने दोघांना पुलालगत वाघ बसून असल्याचे सांगितले.
गावाकडे येण्याकडे पर्याय नसल्याने तिघांनी दोन दुचाकींनी याच मार्गाने येण्याची हिमत केली. कैैलास कोरेवार यांची दुचाकी समोर व जम्बेवार यांची दुचाकी मागे येत असताना चांभार्डा फाट्यालगत असलेल्या पुलाजवळ वाघ बसून असल्याचे दिसले. कोरेवार यांनी ३० मीटर अंतरावर दुचाकी थांबविली. रात्रीची वेळ असल्याने दुचाकीचा प्रकाश पडताच वाघ उभा राहताच कोरेवार यांची तारांबळ उडाली. त्यांनी जोरजोरात ओरडून वाघ बसून असल्याचे मागील दुचाकीस्वारांना सांगितले जोरजोरात हॉर्न वाजविल्यानंतर वाघ लगतच्या जंगलात पसार झाला. परंतु अचानक व्याघ्रदर्शन झाल्याने तिन्ही युवकांचा चांगलाच थरकाप उडाला.