तंमुस निवडीचा वाद कायमच
By admin | Published: October 9, 2016 01:45 AM2016-10-09T01:45:20+5:302016-10-09T01:45:20+5:30
तालुका मुख्यालयापासून सहा किमी अंतरावर असलेल्या महागाव (बु.) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या ...
ग्रामसभा दोनदा तहकूब : संवर्ग विकास अधिकाऱ्यांशी चर्चा
अहेरी : तालुका मुख्यालयापासून सहा किमी अंतरावर असलेल्या महागाव (बु.) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला असल्याने सदर समिती बरखास्त करण्यात आली. मात्र नवी कार्यकारिणी गठित करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने ग्रामपंचायतीत बोलविण्यात आलेल्या तब्बल दोन ग्रामसभा तहकूब कराव्या लागल्या. परिणामी तंटामुक्त समिती कार्यकारिणीच्या निवडीचा वाद अद्यापही कायम आहे.
महागाव (बु.) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा कार्यकाळ सहा महिन्यांपूर्वी संपुष्टात आला. शासन निर्णयानुसार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व इतर सदस्यांची कार्यकारिणीची निवड ग्रामसभेतून करावी लागते. १५ आॅगस्ट व २ आॅक्टोबर २०१६ रोजी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेत निवडीबाबतचा निर्णय झाला नाही. दरम्यान ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाल्याने सभा तहकूब करावी लागली. त्यानंतर ग्रा. पं. पदाधिकारी हेतुपुरस्सर तंमुस कार्यकारिणी गठित करीत नसल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला. त्यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांचे शिष्टमंडळ थेट अहेरीचे बीडीओ चांदेकर यांची ७ आॅक्टोबर रोजी गुरूवारला भेट घेऊन याबाबतची माहिती दिली. महागाव (बु.) चे सरपंच विनायक वेलादी, उपसरपंच मारोती करमे, ग्रामसेविका निमसरकार हेही पंचायत समिती कार्यालयात पोहोचले. ग्रामसेविका निमसरकार यांनी ग्रामसभेचे दस्तावेज व विषयाचे ठराव बीडीओ व पंचायत विस्तार अधिकाऱ्यांना दाखविले. लवकरच ग्रामसभा बोलावून तंमुस कार्यकारिणी गठित करण्यात येईल, असे सांगितले.