'ती'चा कौल 'लाडकी बहीण'ला की 'महालक्ष्मी'ला ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 02:55 PM2024-11-22T14:55:58+5:302024-11-22T14:58:26+5:30
दोन्हीकडूनही दावे, प्रतिदावे : गडचिरोलीची सरशी, आरमोरी द्वितीय तर अहेरी तृतीयस्थानी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात विक्रमी मतदानामध्ये महिलांचा मोलाचा वाटा आहे. गतवेळच्या तुलनेत महिलांचे सुमारे पाच टक्के मतदान अधिक झाले आहे. महिला मतदानात गडचिरोली मतदारसंघाने सरशी मिळवली असून आरमोरी द्वितीय तर अहेरी तृतीयस्थानी आहे. तथापि, वाढलेले मतदान लाडकी बहीणचे की महालक्ष्मीचे याचे उत्तर २३ नोव्हेंबरला मिळणार आहे.
राज्यातील सत्तारुढ महायुती सरकारकडून सध्या महिलांना लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत दीड हजार प्रतिमाह देण्यात येतात, त्यात २१०० रुपयांपर्यंत वाढीची घोषणाही केलेली आहे. महाविकास आघाडीने याच धर्तीवर जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजना जाहीर करुन तीन हजार रुपये प्रतिमाह देण्याचे वचन दिले आहे. महायुतीने महिलांचा वाढलेला टक्का लाडकी बहीणचा असल्याचा दावा केला आहे तर महालक्ष्मी योजनेमुळे महिलांचे वाढलेले मतदान आपल्या पारड्यात पडेल, असा महाविकास आघाडीला विश्वास आहे.
तूर्त दोन्हीकडूनही दावे, प्रतिदावे सुरू आहेत. महिलांना योजनेचा लाभ मिळाल्याने कौल महायुतीलाच मिळाल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी करत आहेत. तर दुप्पट लाभाच्या घोषणेने महिला महायुतीकडे वळाल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
... तरीही पुरुषांचा टक्का अधिकच
महिला मतदारांचा गतवेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला असला तरी नेहमीप्रमाणे पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाचा टक्का कमीच आहे. आरमोरीमध्ये पुरुषांच्या मतदानाचा टक्का ७८.३८, गडचिरोलीत ७५.४८ तर अहेरीत ७५.५१ टक्के इतका आहे. जिल्ह्यात पुरुषांच्या मतदानाचा टक्का ७६.४१ इतका असून महिलांचा टक्का ७४.१० आहे.
महिलांचे मतदान कोठे किती टक्के वाढले?
मतदारसंघ २०१९ २०२४ वाढ
आरमोरी ७१.०७ ७५.५८ ४.५१
गडचिरोली ६८.०६ ७४.३५ ६.२९
अहेरी ६८.०८ ७२.२४ ४.१६
एकूण ६९.०५ ७४.१० ५,०५