जिल्हाभरात बँकांमध्ये तोबा गर्दी
By admin | Published: November 11, 2016 01:13 AM2016-11-11T01:13:24+5:302016-11-11T01:13:24+5:30
५०० व १००० च्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द झाल्याने त्या बदलून घेण्यासाठी गुरूवारी सकाळी
पोलीस बंदोबस्तात व्यवहार : एटापल्लीत लिंक फेलची समस्या उद्भवली; डाक कार्यालयात नोटाच नव्हत्या
गडचिरोली : ५०० व १००० च्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द झाल्याने त्या बदलून घेण्यासाठी गुरूवारी सकाळी बँक उघडताच शेकडो नागरिकांच्या रांगा बँकेसमोर लागलेल्या होत्या. गडचिरोली शहरासह जिल्ह्यात नियमित वेळेतच गुरूवारी बँक उघडल्या. त्यानंतर बँकेत चिक्कार गर्दी दिवसभर दिसून आली.
चामोर्शी- येथे सकाळी ८ वाजतापासूनच बँकेत रांगा लागल्या होत्या. ४ हजार रूपयाच्या नोटा बदलून न देता ती रक्कम पहिले खात्यात भरून नंतर विड्रॉल करण्यास सांगितल्या गेल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. बँक आॅफ महाराष्ट्र व स्टेट बँकेच्या शाखेत प्रचंड गर्दी झाल्याने चामोर्शीच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस संरक्षणात बँकेचे व्यवहार पार पडले. केवळ १० हजार रूपयांपर्यंतचे रक्कम विड्रॉल करता येत असल्यामुळे स्वत:चे चार हजार रूपये भरले व १० हजार रूपये घेतले, असा प्रत्यक्षात सहा हजारांचाच व्यवहार दिवसभर प्रत्येक नागरिकांसाठी चालला. चामोर्शीचा बाजार असल्याने सर्वसामान्यांचेही प्रचंड हाल झालेत.
देसाईगंज- येथे बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया आदीमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून आली. नोटा बदलवून घेण्यासाठी व्यावसायिकांनी नोकरांचाही आधार घेतल्याचे चित्र बँक परिसरात दिसून येत होते. शहरातील व्यापाऱ्यांनी आधीच आपल्या दुकानात काम करणाऱ्या नोकरांना ओळखपत्र आणण्याच्या सूचना केल्या होत्या. नोट बदलविण्याच्या रांगेत दुकानातील नोकर बँकेमध्ये उभे असलेले दिसून आले.
आरमोरी- येथेही पोलिसांच्या देखरेखीत गुरूवारी दिवसभर बँक आॅफ इंडिया, भारतीय स्टेट बँकेचे व्यवहार चाललेत. सराफा व्यापार पूर्णपणे ठप्प असल्याचे दिसून आले. पेट्रोलपंपावरही चिल्लर नसल्याने अनेक वाहनचालक १००० व ५०० रूपयांचेच पेट्रोल आरमोरी शहरात टाकत असल्याचे दिसून आले. ५०० च्या नोटांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. मात्र चिल्लर नसल्यामुळे अनेक ग्राहकांना परत जावे लागले. गुरूवारी एसटीतून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांवर कोणताही परिणाम जाणवला नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यामधून नेहमीसारखेच प्रवाशी बसून जाताना दिसून आले. पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी प्रत्यक्ष बँकांना भेटी देऊन ग्राहक, बँक मॅनेजर यांच्याशी चर्चा केली व ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्यात.
कोरची- येथेही गुरूवारी आठवडी बाजार असल्याने व नागरिकांकडे १०० च्या चिल्लर नोटा नसल्याने मोठी फजिती झाली. ५०० व १००० च्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कोरची शहरात तीन बँका असून सर्वाधिक गर्दी बँक आॅफ इंडियाच्या शाखेत होती. या बँकेत खातेधारकाला दोन हजार रूपयांचा विड्रॉल मिळत होता. पोलीस कर्मचाऱ्यांना ५ नंबरचा अर्ज भरून ५०० व १००० च्या नोटा बदलून फक्त चार हजार व आठ हजार रूपयेच देण्यात आले. बँकेचे शाखा व्यवस्थापक दोडके यांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवहार चालणार असल्याची माहिती लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली. प्रत्येक व्यक्तीला काहिनाकाही रक्कम देण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेच्या कोरची शाखेत एक हजार रूपयांचा विड्रॉल दिला जात होता. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत कॅश नसल्याने फक्त पैसे जमा करण्याचे काम सुरू होते. कोरचीच्या पोस्ट आॅफीसमध्येही सकाळपासूनच कॅश नसल्याने पैसे जमा करण्यासाठी नागरिकांची सकाळपासून गर्दी होती.
सिरोंचा- तालुक्यातील अंकिसा येथेही विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत नागरिकांनी पैसे बदलून घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. वैरागड येथील बँकेच्या शिपायाने दार उघडताच सकाळी ९ वाजतापासून बँक आॅफ इंडियासमोर गर्दी सुरू झाली. लोकांची मोठी झुंबड उडाली होती. बँक व्यवस्थापकांना आपला टेबल सोडून ग्राहकांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागत होते. प्रत्येक ग्राहकाच्या हातात १००० व ५०० ची नोट दिसून येत होती.
आष्टी- येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत ग्राहकांची पैसे जमा करण्यासाठी गर्दी दिसून आली. हिच परिस्थिती भारतीय स्टेट बँकेचीही होती. दिवसभर ग्राहकांच्या रांगाच लागून असल्याचे दिसून आले. आलापल्ली येथील बँक आॅफ महाराष्ट्र व बँक आॅफ इंडियाच्या शाखेतही ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. दोन्ही शाखेत केवळ एक-एक काऊंटर असल्यामुळे जुने ५०० व १००० च्या नोटा परत करून दुसऱ्या नोटा घेण्यासाठी विलंब लागत होता. आलापल्ली- येथील पोस्ट आॅफीसमध्ये आज रोख रक्कम नसल्याने त्यांनी व्यवहार बंद ठेवला होता. रोख रक्कम नसल्याचे सांगून त्यांनी आधीपासूनच सेविंग पैसे जमा होते, अशा ग्राहकाना सुध्दा विड्रॉल देण्यास नकार दिला. पण ५०० व १००० च्या नोटांचा स्वीकार बँकेनेही केला. बँकेमध्ये ज्या प्रमाणे नागरिकांना पैसे बदलून दिल्या जात होते. तसे न करता पैशांचा स्वीकार पोस्टात करण्यात आला. टेलिफोन बिल व इतर बिल भरण्यासाठी मात्र आलापल्लीत पोस्टाने ५०० व १००० च्या नोटा स्वीकारल्या नाहीत. पेट्रोलपंपावर आज सुध्दा ग्राहकांना पूर्ण रक्कमेचेच पेट्रोल ५०० व १००० च्या नोटेवर देण्यात आले.
एटापल्लीत लिंक फेलचा ग्राहकांना फटका
एटापल्ली येथेही नोटा बदलवून घेण्यासाठी ग्राहकांची बँकांमध्ये मोठी गर्दी झाली होती. मात्र रक्कमेचा तुटवडा व लिंक फेल असल्याने ग्राहकांना व्यवहाराविनाच परतावे लागले. सकाळी ११ वाजता पोस्ट आॅफीसमध्ये नोटा बदलवून देण्याची व्यवस्था झालेली नव्हती. पोस्ट मास्तर व्ही. एन. थिपे यांना विचारणा केली असता, पोस्ट आॅफीस नगदी रक्कमेची मर्यादा फक्त ३० हजार रूपये आहे. आज फक्त १५ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. या सर्व नोटा ५०० च्या असल्याने नोटा बदलवून दिल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले. लिंक फेल असल्याने आर्थिक व्यवहार बंदच होते. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या संगणकामध्ये तांत्रिक बिघाड असल्याने व्यवहार ठप्प होता. थोड्यावेळात व्यवहार सुरू होईल, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी लोकमत प्रतिनिधीला दिली. स्टेट बँक आॅफ इंडिया दररोज सकाळी ११ वाजता उघडते. आज मात्र ११.२० ला बँक सुरू झाली. बँकेत प्रचंड गर्दी होती. लिंक फेल असल्याने दुपारी २ नंतर व्यवहार ठप्प होते. त्यामुळे येथून ग्राहक निराश होऊन परत गेले. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेत वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. ५०० व १००० च्या नोटा देण्यात आल्या. सर्वच ठिकाणी ग्राहकांना समाधान झाले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
निवडणुकीत नोटांची टंचाई पडू नये म्हणून शक्कल
गडचिरोलीसह देसाईगंज नगर पालिकेची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना नोटांची टंचाई जाणवू नये, म्हणून एक लाख रूपयांच्या १००० व ५०० च्या नोटांच्या मोबदल्यात ८० हजार रूपये देण्याची तयारी शहरातील काही राजकीय पुढाऱ्यांनी चालविली असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र पसरली आहे. गडचिरोली शहरात मतदारांना पैसा वाटून मत विकत घेण्याचा प्रकार २०११ मध्ये मोठ्या प्रमाणावर झाला होता. पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्र सरकारने ५०० व १००० च्या नोटा बंद केल्या आहे. मात्र या नोटा कमी पैशात खरेदी करून त्याचा वापर निवडणुकीसाठी केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत जोरदार चर्चा शहरात आहे.
नगर पालिका व नगर पंचायती स्वीकारणार नोटा
जिल्हाभरातील नगर पंचायती व नगर परिषदा कराच्या स्वरूपात जुन्या ५०० व १००० नोटा ११ नोव्हेंबर रोजी स्वीकारणार आहेत. मालमत्ता ज्या व्यक्तीच्या नावाने कर वसुली आहे. त्या व्यक्तीने स्वत: अथवा त्या व्यक्तीने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस कराचा भरणा करता येईल. मात्र त्रयस्त पक्षाने रक्कमेचा भरणा केल्यास ओळखीचा वैध पुरावा सादर करावा लागेल. जुन्या चलनातील नोटा कराच्या स्वरूपात शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पर्यंतच स्वीकारले जातील, असा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने घेतला आहे.