तंबाखूजन्य साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:00 AM2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:40+5:30

तंबाखूजन्य पदार्थाचा तुटवडा असल्याने त्याची चढत्या भावाने विक्री होत आहे. शहरातील किराणा दुकानांवर पोलिसांची करडी नजर असल्याने येथील विक्री बंद असली तरी ग्रामीण भागात ही विक्री सुरू असल्याचे आढळून आले. मुक्तिपथ कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गावांमधील अशा दुकानांमध्ये धाड टाकून तंबाखूजन्य साहित्य जप्त करून नष्ट केले.

Tobacco content seized | तंबाखूजन्य साहित्य जप्त

तंबाखूजन्य साहित्य जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देदुकानावर धाड : गडचिरोलीसह आरमोरी,अहेरी तालुक्यात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने वर्षभरासाठी सर्वच प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. असे असतांनाही किराणा दुकानांतून त्याची विक्री होत आहे. अशा किराणा दुकानांची पोलीस पाटील आणि मुक्तिपथ गाव संघटनांच्या सहकार्याने झडती घेत मुक्तिपथ तालुका कार्यकर्त्यांनी अनेक दुकानांतून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून नष्ट केले. सदर कारवाई गडचिरोली, आरमोरी, अहेरी, भामरागड, चामोर्शी, देसाईगंज आदी सहा तालुक्यात करण्यात आली.
तंबाखूजन्य पदार्थाचा तुटवडा असल्याने त्याची चढत्या भावाने विक्री होत आहे. शहरातील किराणा दुकानांवर पोलिसांची करडी नजर असल्याने येथील विक्री बंद असली तरी ग्रामीण भागात ही विक्री सुरू असल्याचे आढळून आले. मुक्तिपथ कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गावांमधील अशा दुकानांमध्ये धाड टाकून तंबाखूजन्य साहित्य जप्त करून नष्ट केले. आरमोरी तालुक्यातील कुरंझा व पळसगाव येथील किराणा दुकानांमध्ये तपासणी केली असता सुगंधित तंबाखू व इतरही साहित्य सापडले. त्याचबरोबर पानठेलाधारकांच्या घराची झडती घेतली असता तिथेही मुद्देमाल सापडला. हे सर्व साहित्य नष्ट करण्यात आले. किराणा दुकाने अत्यावश्यक सेवेत येत असली तरी दुपारी १२ पर्यंतच ती सुरू ठेवण्याची परवानगी आहे. पण गावांमध्ये या नियमाला डावलून दिवसभर दुकाने सुरू असतात व त्यातून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत आहे.
गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव आणि काटली येथील किराणा दुकानांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात मझा सुगंधित तंबाखू व सिगारेटची पाकिटे सापडली. अहेरी तालुक्यात महागाव बू. आणि महागाव खुर्द येथील तब्बल २१ दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आवाहन केले. तीन दुकानात सापडले साहित्य नष्ट केले. चामोर्शी तालुक्यात पावीमुरांडा या गावी ७ दुकानांची तपासणी केली. २ दुकानांमध्ये सापडलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा त्यांनी नष्ट केला. वडसा तालुक्यातील तुळशी या गावी एका दुकानातून गुडाखूचा मोठा साठा जप्त केला.
भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा या गावी दुकानदारांना समज देत तंबाखूजन्य पदार्थ व खर्रा बनविण्याचे साहित्य जप्त केले. किराणा दुकानामधून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करावी आणि कोरोना विरोधात लढण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुक्तिपथने केले.

Web Title: Tobacco content seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.