तंबाखू नियंत्रण कायद्याची जिल्ह्यात सर्रास पायमल्ली सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:40 PM2019-05-30T23:40:27+5:302019-05-30T23:41:00+5:30
तंबाखूचे आरोग्यावर फार मोठे दुष्परिणाम होत असल्याने शासनाने तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवून काही नियम आखून दिले आहे. यासाठी भारत सरकारने स्वतंत्र तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा) तयार केला आहे. मात्र या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तंबाखूचे आरोग्यावर फार मोठे दुष्परिणाम होत असल्याने शासनाने तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवून काही नियम आखून दिले आहे. यासाठी भारत सरकारने स्वतंत्र तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा) तयार केला आहे. मात्र या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे दिसून येते. अगदी प्रतिबंधीत तंबाखू व प्रतिबंधीत क्षेत्रातही तंबाखूची विक्री खुलेआम होत असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र गप्प असल्याचे दिसून येते.
भारत सरकारच्या २००३ च्या कोटपा कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिघात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री हा दंडनिय गुन्हा मानला गेला आहे. शैक्षणिक संस्थांपासून १०० मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घालावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. शासनाने त्याबाबतचा अनुपालन अहवाल मागितला होता. या अनुपालन अहवालात शाळा महाविद्यालयाच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी आमच्या शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिघात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत नसल्याचे कळविले आहे. यु-डायस मधील रखाण्यात सर्वच शाळांनी तंबाखूमुक्त शाळा असल्याची माहिती भरली आहे. मात्र कोणत्याही गावात गेले तरी शाळेच्या संरक्षण भिंतीला लागून, तर काही ठिकाणी प्रवेशद्वाराला लागूनच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे वास्तव दिसते.
३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो.
जागतिक पातळीवरून तंबाखूवर नियंत्रण आणण्यासाठी तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच ध्येय, धोरणांचा आढावा यानिमित्ताने घेतला जातो.
तंबाखू सोडण्याच्या युक्त्या
तंबाखूजन्य पदार्थ नजरेसमोर न ठेवता लपवून ठेवा. जे नजरेसमोर नसते, ते आठवत सुध्दा नाही. हा एक सोपा उपाय ठरू शकतो. तंबाखूजन्य पदार्थ लवकर मिळतील, अशा ठिकाणी ठेवू नका. ते दुसºया खोलीत किंवा तुम्ही नेहमी जात नाही, अशा कुलूपाच्या कपाटात ठेवा.
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना टाळण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांच्यापासून दूर राहा. तोंडात चॉकलेट, च्युइंगम, पेपरमिंट ठेवा व दीर्घ श्वास घेण्याचा सरावा करा. जेव्हा तल्लफ येईल, तेव्हा उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक पेला थंड पाणी प्या.
व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास मदत होते. जेव्हा तंबाखू सेवनाची तल्लफ येईल तेव्हा तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भविष्याबाबत विचार करा. तुमच्यावर तंबाखूमुळे होणाºया भयंकर रोगांचा विचार करा. सेवन थांबविण्याची एक तारीख ठरवा. मदतनिसाची मदत घ्या.
तुमचे वेळापत्रक तंबाखूजन्य पदार्थ वगळून आखा. जेव्हा धुम्रपानाची तल्लफ येईल, तेव्हा काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करा, दोन सिगारेटमध्ये विलंब करा. दीर्घ श्वास घ्या, पाणी प्या. स्वतासाठी सकारात्मक बोला. स्वत:ला पुरस्कृत करा.
दररोज योग, चालणे, ध्यानधारणा, नृत्य, संगीत आदी तंत्र अवलंबा. सक्रीय राहा व पोषक आहार घ्या, असा सल्ला प्रकाश व्यसनमुक्ती केंद्र देसाईगंजचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी दिला आहे.
तंबाखूचे असे आहेत दुष्परिणाम
भारतात ८२ टक्के फुफ्फुसाच्या रोगांचे प्रमुख कारण धुम्रपान आहे. धुम्रपान करणाºयांना क्षयरोग सुध्दा होण्याचा धोका संभवतो. धुम्रपानामुळे रक्तदाब वाढून हृदयाकडे जाणारा रक्त पुरवठा कमी होतो. तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमण्यांच्या पापुद्र्याचे नुकसान करते. धुम्रपानामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. भारतात तंबाखूमुळे दर आठ सेकंदाला एकाचा मृत्यू होतो. तंबाखूपासून दूर राहिल्यास जीवनकाळ २० वर्षाने वाढू शकते.