दुकानातून तंबाखू होणार गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:00 AM2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:00:32+5:30
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तंबाखू, खर्रा, नस, गुडाखू सिगारेट, बिडी यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर राज्यासह जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीर गडचिरोली किराणा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिलीप सारडा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. या बैठकीला शहरातील किराणा व्यापारी उपस्थित होते. सोबतच मुक्तिपथ संचालक डॉ. मयूर गुप्ता, तालुका संघटक अमोल वाकुडकर व उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व कोरोना संसर्गाचा प्रसार हा निकटचा संबंध आहे. हा सहसंबंध तोडण्यासाठी किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गडचिरोली किराणा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व संमतीने घेतला.
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तंबाखू, खर्रा, नस, गुडाखू सिगारेट, बिडी यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर राज्यासह जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीर गडचिरोली किराणा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिलीप सारडा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. या बैठकीला शहरातील किराणा व्यापारी उपस्थित होते. सोबतच मुक्तिपथ संचालक डॉ. मयूर गुप्ता, तालुका संघटक अमोल वाकुडकर व उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.
कोरोना संसर्गाचा धोका तालुक्यात व जिल्ह्यात पसरू नये यासाठी प्रशासनाच्या आवश्यक त्या सूचनांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिल्हा प्रशासनाने तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी लक्षात घेत शहरातील किराणा दुकानांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विकणार नसल्याचा निर्णय असोसिएशने यावेळी जाहीर केला. विक्री करणाऱ्या दुकानदारास असोसिएशन कुठलीही मदत करणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले.
डॉ. मयूर गुप्ता म्हणाले, कोरोनाचे संकट जिल्ह्यात वेगाने पसरत आहे. अशा वेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी असोसिएशनने घेतलेला हा निर्णय कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी तसेच लोकांचे आरोग्य राखण्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. जास्तीत जास्त दुकानांना यात सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी असोसिएशनला यावेळी केले.