गडचिरोली जिल्ह्यात राखीची ओवाळणी म्हणून गावात खर्रा बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:54 PM2018-08-28T12:54:18+5:302018-08-28T12:56:39+5:30
भामरागड तालुक्यातील कोठी येथील महिला दारूबंदी व खर्राबंदी समितीच्या सदस्यांनी पोलिसांना राखी बांधल्यांनतर ओवाळणी म्हणून गावातील खर्रा बंद करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोठी येथील महिला दारूबंदी व खर्राबंदी समितीच्या सदस्यांनी पोलिसांना राखी बांधल्यांनतर ओवाळणी म्हणून गावातील खर्रा बंद करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी खर्रा विक्रेत्यांवर धाड टाकून खर्रा बनविण्याचे साहित्य जप्त केले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुगंधीत तंबाखूपासून बनलेल्या खऱ्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. यात प्रत्येक कुटुंबाचा खर्च तीन हजार रूपायांपेक्षाही अधिक आहे. महाराष्ट्रात या तंबाखूवर बंदी असली तरी नजीकच्या छत्तीसगड राज्यातून हा तंबाखू आणला जातो. त्यामुळे बंदीनंतरही या खर्याची विक्री गावागावात खुलेआम सुरू आहे. खर्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो, कुटुंबाला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागतो. मुक्तीपथ या स्वयंसेवी संस्थेने जिल्हाभरात खर्रा व तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याचे काम मागील वर्षभरापासून हाती घेतले आहे. या संस्थेच्या पुढाकारातून गावस्तरावर समित्या गठीत केल्या आहेत. नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या कोठी गावातही महिला दारूबंदी समिती, सुगंधीत तंबाखू विरोधी महिला समिती गठित करण्यात आली आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी या महिला सदस्यांनी गावातीलच पोलीस मदत केंद्राच्या जवानांना राख्या बांधल्या. ओवाळणी म्हणून गावात खर्राबंदी करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच गावातील पाच पानठेल्यांवर धाड टाकून खर्रा बनविण्याच्या पाच मशिन व इतर साहित्य जप्त करून साहित्याची होळी करुन महिलांना रक्षाबंधनाची भेट दिली. या उपक्रमामुळे गावात खर्राबंदी होण्यास मदत होणार आहे.