आजपासून काेविडमुक्त भागातील 160 शाळांचे प्रत्यक्ष वर्ग भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 05:00 AM2021-07-15T05:00:00+5:302021-07-15T05:00:26+5:30
काेविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच शाळा बंद आहेत. परिणामी गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. या वर्षीच्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभसुद्धा ऑनलाइन पद्धतीने २८ जूनपासून झाला आहे. विद्यार्थ्यांविना शाळा सुरू असल्या तरी त्या नाममात्र आहेत.
दिलीप दहेलकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शासन व प्रशासनाने केलेल्या उपाययाेजनांमुळे राज्यातील काेराेनाचा प्रादुर्भाव आता बराच कमी झाला आहे. काेराेनाची परिस्थिती सुधारल्यामुळे राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाच्या ७ जुलै २०२१ च्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यातील काेविडमुक्त भागातील १६० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे वर्ग गुरूवार दि.१५ जुलैपासून प्रत्यक्षात भरणार आहेत. त्यामुळे या शाळांमधील आठवी ते बारावीच्या वर्गात पुन्हा किलबिलाट सुरू होणार आहे.
काेविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच शाळा बंद आहेत. परिणामी गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. या वर्षीच्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभसुद्धा ऑनलाइन पद्धतीने २८ जूनपासून झाला आहे. विद्यार्थ्यांविना शाळा सुरू असल्या तरी त्या नाममात्र आहेत. गडचिराेली जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आहे. कव्हरेजच्या समस्येमुळे ऑनलाइन शिक्षणाचा बऱ्याच ठिकाणी बट्ट्याबाेळ झाला आहे. दरम्यान विद्यार्थी व पालकांच्या मागणीचा विचार करून वर्ग सुरू करण्यास मुभा दिली आहे.
शहरी भागातील शाळांबाबत अनिश्चितता
- ७ जुलै २०२१ च्या जीआरनुसार ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत, गावस्तरावरील समिती व शाळा व्यवस्थापन समित्यांनी करावयाची कार्यवाही व मार्गदर्शन तत्त्वे शासनाने दिली आहेत. मात्र शहरी भागातील शाळा सुरू कराव्यात की नाही, याबाबत या जीआरमध्ये कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे शहरी भागातील विद्यार्थी, शिक्षक, पालक बुचकळ्यात पडले आहेत. शिक्षण विभागानेही त्याबाबत स्पष्ट सूचना दिली नसल्यामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांना तूर्त ऑनलाइन वर्गावरच अवलंबून राहावे लागणार आहे.
खबरदारीबाबत या आहेत अटी
- संबंधित गावात गेल्या महिनाभरापासून काेविड रुग्ण आढळून आलेला नसावा.
- गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
- एखादा विद्यार्थी काेविडग्रस्त आढळून आल्यास तत्काळ शाळा बंद करून मुख्याध्यापकांनी शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू करावे.
- शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बाेलविण्यात यावे.
- दरराेज ५० टक्के विद्यार्थी आळीपाळीने शाळेत बाेलवावे.
- एका बाकावर एकच विद्यार्थी, दाेन बाकांमध्ये सहा फूट अंतर ठेवावे.
- सतत हात साबणाने धुवावेत, मास्कचा वापर करावा.
अशी आहे ग्रामस्तरावरील समिती
- काेविडमुक्त गावातील शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्यासाठी तेथील ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव असणे गरजेचे आहे. यासाठीची प्रक्रिया राबविण्याकरिता ग्रामस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, असे ७ जुलै २०२१ च्या जीआरमध्ये नमूद आहे. शाळा सुरू हाेणाऱ्या गावांमध्ये अशा समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, निमंत्रित सदस्य म्हणून प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवक तसेच मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.