मार्कंडात आजपासून शिवभक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 10:38 PM2019-03-03T22:38:22+5:302019-03-03T22:38:57+5:30
महाशिवरात्री निमित्त जिल्हाभरातील अनेक देवस्थानांमध्ये जत्रा भरते. चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथील जत्रा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा आहे. महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव येथे शिवभक्तांची गर्दी उसळणार आहे. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी/मार्र्कंडादेव : महाशिवरात्री निमित्त जिल्हाभरातील अनेक देवस्थानांमध्ये जत्रा भरते. चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथील जत्रा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा आहे. महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव येथे शिवभक्तांची गर्दी उसळणार आहे. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीपासून १० दिवसांची जत्रा भरते. जत्रेच्या १० दिवसांपूर्वीच दुकाने लागण्यास सुरूवात होती. शासकीय कार्यालयांना सोमवारी महाशिवरात्रीची सुटी आहे. त्यानंतर ९ तारखेच्या शनिवार शिवाय सुटी नाही. परिणामी सोमवारीच मार्र्कंडादेव येथे मोठी गर्दी उसळणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मागील दोन ते तीन दिवसांपासून प्रशासनाचे अधिकारी मार्र्कंडा येथे ठाण मांडून बसले आहेत.
नदीत नावेने प्रवास करणाऱ्या भाविकांना लाईफ जॅकेट पुरविले जाणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास जनरेटरची सुविधा राहिल, मंदिरात व्हीआयपी रांग राहणार असून यात फक्त गर्भवती माता, वृध्द नागरिक, अपंग व्यक्ती यांना प्रवेश दिला जाईल. नदीवर सोलर फ्लॅश लावला जाईल. तो पाण्याच्या आतून सुध्दा चमकत राहिल. जिथे खोल पाणी आहे, तिथे सोलर फ्लॅश लावला जाणार आहे. अग्निशमन वाहने सुध्दा ठेवली जाणार आहेत. मोबाईल कव्हरेज राहावे, यासाठी स्वतंत्र मोबाईल टॉवर व्हॅन बसविण्याची सूचना बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. महिलांसाठी चेंजींग रूम, पानपोईची सुविधा उपलब्ध केली आहे. सफाई करण्यासाठी २० कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. तसेच २४ तास वीज पुरवठा, शुध्द पाणी पुरवठा, शौचालयांची स्वच्छता ठेवली जाणार आहे, अशी माहिती पंचायत समिती सभापती आनंद भांडेकर, सरपंच उज्वला गायकवाड, सचिव दिनेश सराटे यात्रा अधीक्षक डी. पी. भोगे यांनी दिली आहे.
रामप्रसाद महाराज धर्मशाळेच्या वतीने भाविकांना राहण्याची सोय, महाप्रसाद, निवास व्यवस्था, आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
४०६ पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात
जत्रेदरम्यान मार्र्कंडा येथे हजारो भाविक येतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे व सहायक यात्रा बंदोबस्त अधिकारी पोलीस निरिक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या नेतृत्वात सुमारे ४०६ पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात राहणार आहेत. यामध्ये सहा पोलीस निरिक्षक, ३४ पोलीस उपनिरिक्षिक, २८० पुरूष पोलीस कर्मचारी, ८० महिला पोलीस कर्मचारी, गडचिरोली वाहतूक शाखेचे एक अधिकारी व सहा कर्मचारी, गृहरक्षक दलाचे शेकडो कर्मचारी, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक राहणार आहेत.