शौचालयाचे काम ६५ टक्के

By admin | Published: March 27, 2017 12:48 AM2017-03-27T00:48:07+5:302017-03-27T00:48:07+5:30

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाने ३ हजार ५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले.

Toilets work 65 percent | शौचालयाचे काम ६५ टक्के

शौचालयाचे काम ६५ टक्के

Next

१३९३ शौचालये पूर्ण : गडचिरोली पालिकेने केला आतापर्यंत सव्वातीन कोटींचा खर्च
गडचिरोली : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाने ३ हजार ५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले. यापैकी पालिका प्रशासनाने आतापर्यंत १ हजार ३९३ शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरात सुरू असलेल्या वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामावर आतापर्यंत ३ कोटी १५ लाख ७८ हजार रूपयांचा खर्च अनुदानापोटी करण्यात आला आहे. सध्या शौचालयाचे काम ६५ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे.
नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरात जुलै २०१५ पासून शौचालय निर्मितीचे काम हाती घेण्यात आले. शौचालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील सर्वच वार्डांमध्ये फिरून किती कुटुंबधारकांकडे शौचालय आहेत, किती कुटुंबाकडे शौचालय नाही, याबाबतचे सर्वेक्षण केले. त्यानंतर शौचालय नसणाऱ्या कुटुंब प्रमुखांना नगर पालिका कार्यालयात अर्ज दाखल करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. वैयक्तिक शौचालयाच्या लाभासाठी गडचिरोली शहरातून आतापर्यंत एकूण २ हजार ८०८ लाभार्थ्यांचे अर्ज पालिका प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी पालिका प्रशासनाने २ हजार २७० शौचालय मंजूर केले आहेत. मंजुरपैकी १ हजार ३९३ शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. प्राप्त अर्जापैकी त्रुट्या आढळलेले २६४ अर्ज रद्द करण्यात आले आहे. ९०० शौचालयाचे काम अपूर्ण असून ते सुरू आहे. लाभार्थ्यांना शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यासाठी अग्रीम स्वरूपात पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम प्रत्येकी सहा रूपये अदा करण्यात आली आहे. पालिकेला शौचालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारकडून १२ हजार रूपये अनुदान देय आहे. एवढ्या रक्कमेत शौचालयाचे बांधकाम शक्य नसल्याची बाब लक्षात आल्यावर पालिका प्रशासनाने आपल्या स्तरावरून लाभार्थ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका प्रशासनातर्फे शौचालय लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये अनुदान दिले जात आहे. केंद्र सरकार व पालिका प्रशासन मिळून लाभार्थ्यांना एकूण १७ हजार रूपयांचे अनुदान दिले जात आहे. संबंधित लाभार्थ्याने काम पूर्ण झालेल्या शौचालयाचे फोटो सादर केल्यानंतर पडताळणीची कार्यवाही केली जात आहे. त्यानंतर अहवाल प्राप्त होताच पालिका प्रशासनातर्फे संबंधित लाभार्थ्यांना शिल्लक अनुदान दिले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई होणार
गडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या २ हजार २७० शौचालयांपैकी पाच ते सहा शौचालयाचे काम संबंधित लाभार्थ्यांनी अद्यापही सुरू केले नाही, असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याचे अनुदान घेतले आहे. अशा लाभार्थ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी दिला आहे.

१०० टक्के काम करण्याचे न.प. समोर आव्हान
वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम मंजूर झालेल्या संबंधित लाभार्थ्याने शौचालयाचे काम विहीत वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित लाभार्थ्यांना नगर पालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. शासनाने गडचिरोली शहरातील मंजूर शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत दिली आहे. येत्या पाच दिवसात शहरातील सर्वच शौचालयाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. त्या दिशेने पालिका प्रशासन गतीने प्रयत्न करीत आहे.

१४ व्या वित्त आयोगाचा निधी वापरता येणार
न.प. प्रशासनाने शौचालय बांधकामासाठी २ हजार २७० लाभार्थ्यांना ६ हजार प्रमाणे पहिला हप्ता दिला. १ हजार ९१४ लाभार्थ्यांना ५ हजार प्रमाणे ९५ लाख ७० हजार रूपयांचे अनुदान दिले. त्यानंतर १ हजार ३९३ लाभार्थ्यांना ६ हजार प्रमाणे तिसऱ्या हप्त्याचे अनुदान दिले. शासनाकडून प्राप्त झालेला निधी संपल्यास चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेला निधी शौचालय अनुदानावर पालिकेला खर्च करता येणार आहे.

५७ लाभार्थी लेटलतीफ
न.प. प्रशासनाच्या वतीने शौचालय बांधकामाबाबत सुरूवातीपासूनच जनजागृती केली जात आहे. शिवाय उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होत आहे. या कारवाईचा धसका घेऊन शहरातील ५७ कुटुंबधारकांनी शौचालयासाठी पालिका कार्यालयात येऊन गुरूवारी अर्ज दाखल केले.

Web Title: Toilets work 65 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.