शौचालयाच्या कामात अहेरी, एटापल्ली तालुके माघारले
By admin | Published: January 15, 2017 01:27 AM2017-01-15T01:27:12+5:302017-01-15T01:27:12+5:30
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शासनाने गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात
बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतचा अल्टीमेटम : जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कारवाईचे संकेत
गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शासनाने गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात एकूण ३४ हजार २४९ वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले आहेत. यापैकी १५ हजार २६४ शौचालय पूर्ण झाले आहेत. अहेरी व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक शौचालय अपूर्ण स्थितीत असून हे तालुके शौचालय बांधकामात माघारले आहेत.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अहेरी तालुक्याला ४ हजार २९३ व एटापल्ली तालुक्याला २ हजार ८३० वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने सन २०१६-१७ या वर्षात प्रशासनाला दिले आहेत. यापैकी आतापर्यंत अहेरी तालुक्यात १२०० तर एटापल्ली तालुक्यात १ हजार १३० शौचालयाचे काम पूर्ण झाले आहेत. अद्यापही अहेरी तालुक्यात ३ हजार ९३ व एटापल्ली तालुक्यात १ हजार ७०० शौचालयाचे काम अपूर्ण आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत सर्व शौचालयाचे काम पूर्ण करून शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला आहे. या संदर्भात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनीही सर्व ग्रामसेवकांना ३१ मार्च २०१७ पर्यंत शौचालयाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
३१ मार्च २०१७ पर्यंत गावातील शौचालयाचे बांधकाम पूर्ण न करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असे संकेत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी दिले आहेत. संपूर्ण बाराही तालुक्यात आतापर्यंत ५० टक्के पेक्षा कमी शौचालयाचे काम पूर्ण झाले आहेत. उर्वरित १८ हजार ९८१ शौचालयाचे काम येत्या अडीच महिन्यात पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात शौचालयाच्या कामात गती नसल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)
७ हजार ४२५ लाभार्थ्यांना ८९१ लाख रूपये अनुदान वाटप
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम हाती घेतलेल्या तसेच पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील जवळपास ७ हजार ४२५ लाभार्थ्यांना ८९१ लाख रूपयांचे अनुदान आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील लाभार्थ्यांना ६८.२८ लाख, आरमोरी तालुक्यातील लाभार्थ्यांना ५७.१२ लाख, भामरागड ४३.२० लाख, चामोर्शी १२६.१२ लाख, धानोरा १०९.३२ लाख, एटापल्ली ४०.५६ लाख, गडचिरोली ९९.४८ लाख, कोरची ९७.६८ लाख, कुरखेडा ५३.७६ लाख, मुलचेरा ९६.७२ लाख तर सिरोंचा तालुक्यातील लाभार्थ्यांना ९८.७६ लाख रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. अनुदान मिळूनही काही लाभार्थी शौचालयाच्या कामात दिरंगाई करीत आहेत.