नळ योजनेतील पाण्याच्या टाकीत अज्ञात इसमाने टाकले विषारी द्रव्य

By admin | Published: June 20, 2016 01:05 AM2016-06-20T01:05:46+5:302016-06-20T01:05:46+5:30

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कुलकुली ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळ योजनेच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास विषारी द्रव्य ...

Tomato Pesticide Scheme | नळ योजनेतील पाण्याच्या टाकीत अज्ञात इसमाने टाकले विषारी द्रव्य

नळ योजनेतील पाण्याच्या टाकीत अज्ञात इसमाने टाकले विषारी द्रव्य

Next

कुलकुली येथील घटना : संपूर्ण गावाला संपविण्याचा प्रयत्न अयशस्वी; ग्रामपंचायततर्फे मालेवाडा पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखल
आरमोरी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कुलकुली ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळ योजनेच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास विषारी द्रव्य टाकल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी नळातून येणाऱ्या पाण्याचा अनैसर्गिक वास येत असल्याचे लक्षात येताच तत्काळ ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठा बंद करून पाणी न पिण्याच्या सूचना ग्रामस्थांना करण्यात आल्या. त्यामुळे फार मोठी जीवितहानी टळली

तपासणीसाठी पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठविले
नळाचे सदर बाधित पाणी पिल्याने गावातील दोन ते तीन इसमांना उलटी व डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती ठिक झाली. नळाच्या पाण्याने शिजविलेले अन्न खड्डा खोदून गाडण्यात आले. विषारी द्रव्याने बाधित झालेले २५ हजार लिटर पाणी जमिनीत सोडण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. याचा अहवाल आल्यानंतर पाण्यातील विषारी द्रव्य नेमके कोणते हे कळणार आहे.

आरोपीला तत्काळ अटक करा
सदर घटनेची माहिती मिळताच पिसेवडधाचे मंडळ अधिकारी व भाकरोंडीचे तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली. पाण्याच्या टाकीची पाहणी करून कुलकुलीच्या सरपंच बेबी मडावी, उपसरपंच जितेंद्र रामटेके, ग्रामसेवक निलेश जौंजाळकर, रामदास उईके, तंमुस अध्यक्ष लक्ष्मण उईके व ग्रा.पं. सदस्यांच्या उपस्थित पंचनामा केला. गावकऱ्यांच्या जिवनाशी खेळ करणाऱ्या आरोपीचा तत्काळ शोध घेऊन त्याला अटक करावी, अशी मागणी ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे.

सदर घटनेने संपूर्ण गावाला संपविण्याचा प्रयत्न झाल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत कुलकुली ग्रामपंचायतीने मालेवाडा पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखल केली आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कुलकुली ग्रा.पं.तर्फे गावाला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जि.प. शाळेच्या परिसरात ४० हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी उभारण्यात आली. फेब्रुवारीपासून गावात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. खासगी नळधारकही या योजनेच्या पाण्याचा उपयोग करतात. दरम्यान अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास पाण्याच्या या टाकीत विषारी द्रव्य टाकून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांनी नळाला पाणी सोडले. दरम्यान पाण्यातून अनैसर्गिक स्वरूपाचा वास येऊ लागला. गावकऱ्यांना पाण्याची शहानिशा केली असता, पाण्यात विषारी द्रव्य मिसळल्याचे निदर्शनास आले. लगेच पाणी पुरवठा बंद करून तत्काळ गावात फिरून नळाचे पाणी पिण्यासाठी न वापरण्याच्या सूचना ग्रामस्थांना करण्यात आल्या. त्यामुळे मोठी प्राणहानी टाळता आली. ग्रा.पं.तर्फे पाणी टाकी शुध्दीकरणाचे काम सुरू आहे. या घटनेसंदर्भात ग्रा.पं.ने मालेवाडा पोलीस मदत केंद्रात अज्ञात इसमाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Tomato Pesticide Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.