गडचिराेलीत पहिल्यांदाच जिभेच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 10:33 AM2021-12-16T10:33:36+5:302021-12-16T10:43:44+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात यापूर्वी अल्सर, अपेंडिस, छाेट्या-माेठ्या गाठी व तत्सम अनेक आजारावरील शस्त्रक्रिया हाेतात. मात्र, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया २०२१ डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच पार पडली.

Tongue cancer surgery for the first time in government hospital gadchiroli | गडचिराेलीत पहिल्यांदाच जिभेच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया

गडचिराेलीत पहिल्यांदाच जिभेच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देआरमाेरीतील पीडित रुग्ण महिलेला दिलासाम. फुले जनआराेग्य याेजनेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार

दिलीप दहेलकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्यचिकित्सकांनी (सर्जन) पुरेपूर प्रयत्न करून जिभेच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या महिला रुग्णाला जीवनदान दिले. विशेष म्हणजे, १५ डिसेंबर राेजी बुधवारला गडचिराेलीच्या या शासकीय रुग्णालयात पहिल्यांदाच ही कठीण शस्त्रक्रिया पार पडली.

आरमाेरी शहरातील एका ४६ वर्षीय महिलेला जिभेचा कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर ती महिला रुग्ण धास्तावली. या महिलेच्या डाव्या बाजूच्या जिभेला छाेटे फाेड आले हाेते. शिवाय मानेमध्ये तीन गाठी हाेत्या. येथील कान, नाक, घसा तथा कॅन्सर तज्ज्ञ डाॅ. अजय कांबळे यांनी सुरुवातीला या महिलेच्या मासाचा तुकडा घेऊन त्याची तपासणी केली असता जिभेच्या कॅन्सरचे निदान झाले. त्यानंतर सिटी स्कॅन व रक्तचाचणी करण्यात आली. या दाेन्ही चाचण्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. या महिलेला जिभेचा कॅन्सर झाल्याचे १०० टक्के निदान झाले.

जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल रुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जन डाॅ. अजय कांबळे व सर्जन डाॅ. तुषार डहाके, बधिरीकरण तज्ज्ञ डाॅ. नागसेन साखरे यांनी व त्यांच्या चमुनी जवळपास साडेतीन ते चार तास ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. दाेन बाय दाेन आकाराची जिभेची एक गाठ व मानेतील एक बाय एक आकाराच्या तीन गाठी बाहेर काढल्या.

जिल्हा सामान्य रुग्णालयात यापूर्वी अल्सर, अपेंडिस, छाेट्या-माेठ्या गाठी व तत्सम अनेक आजारावरील शस्त्रक्रिया हाेतात. मात्र, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया २०२१ डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच पार पडली. आरमाेरीची संबंधित रुग्ण महिला दीड ते दाेन महिन्यांपासून जिभेच्या कॅन्सरने ग्रस्त हाेती. हा राेग पहिल्या स्टेजवर हाेता. निदानही लवकर झाले. त्यामुळे येथील डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. दरम्यान ही महिला रुग्ण सामान्य कुटुंबातील असून महात्मा फुले जन आराेग्य याेजनेतून ही कठीण शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली.

पहिल्यांदा रुग्णाचा रक्तदाब वाढला तेव्हा शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली. परत दुसऱ्यांदा रक्तदाब वाढूनही आवश्यक असल्यामुळे महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर महिला रुग्णाची प्रकृती सध्या ठीक असून तिला काेणताही त्रास नाही, असे डाॅ. कांबळे यांनी सांगितले.

पुन्हा औषधाेपचार घ्यावा लागणार

गडचिराेलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी रेडिओथेरपी व किमाेथेरपी या औषधाेपचाराची सुविधा आहे. शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णावर या दाेन्ही पद्धतीने औषधाेपचार करण्यात येणार आहे. नागपूर, चंद्रपूर येथे कॅन्सर रुग्णांवर शस्त्रक्रिया हाेतात, गडचिराेलीत झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.

ही आहेत जिभेच्या कर्कराेगाची लक्षणे

शल्य चिकित्सकांच्या माहितीनुसार जिभेच्या कर्कराेगाची अनेक लक्षणे आहेत. यामध्ये ताेंड सुन्नता, जिभेवर पांढरे किंवा लाल डाग, घसा दुखणे, मानेमध्ये ढेकूळ, कान दुखणे, जबडा सूज, दात अंतर्गत सैलपणा, बनावट दात घालण्यास त्रास हाणे, जिभेमध्ये वेदना, जिभेच्या आत फाेड, जिभेपासून रक्तत्राव, दीर्घकालीन घसा खवखवणे, बाेलण्यात त्रास, खाण्यापिण्यात अडचण आदींचा समावेश आहे.

तंबाखूचे सेवन, मद्यपान करणे, दात खाजवणे, दातात पदार्थ लागण्याऐवजी जिभेवर लागणे, बनावट दात दुरुस्त न हाेणे आदींमुळे जिभेचा कर्कराेग हाेताे.

जिभेचा कर्कराेग हाेऊ नये यासाठी स्वच्छतेची काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे. ताेंडाच्या आराेग्याची नियमित तपासणी करावी, फळे व भाज्या खाव्या, अन्नात सर्व पाेषक घटकांचा समावेश करावा, नियमित ब्रश करून ताेंड स्वच्छ ठेवावे, धूम्रपान, मद्यपान करू नये.

Web Title: Tongue cancer surgery for the first time in government hospital gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.