दारूबंदीच्या १४१ कारवाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:40 PM2019-04-16T23:40:44+5:302019-04-16T23:41:15+5:30
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान हातभट्टीच्या दारूसह देशी-विदेशी दारूची वाहतूक रोखण्यात पोलीस यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले. मतदानाच्या दिवसापर्यंत जिल्हाभरात १० हजार ३४० लिटर दारू जप्त करून १४१ गुन्हे दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान हातभट्टीच्या दारूसह देशी-विदेशी दारूची वाहतूक रोखण्यात पोलीस यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले. मतदानाच्या दिवसापर्यंत जिल्हाभरात १० हजार ३४० लिटर दारू जप्त करून १४१ गुन्हे दाखल करण्यात आले. यात विविध वाहनांसह १ कोटी २४ लाख रुपयांचा ऐवज विविध ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
जिल्ह्यात आधीच दारूबंदी, त्यामुळे मद्यपी लोकांना या गोष्टीचे मोठेच अप्रुप आहे. याचा फायदा घेत राजकीय पक्षांकडून मतदारांना दारूचे प्रलोभन दाखवून मते मिळविण्याचा प्रयत्न होतो. ही बाब टाळून यावेळची निवडणूक दारूमुक्त करण्याचा संकल्प करून मुक्तिपथ गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेत जनजागृती केली. पोलिसांनीही ठिकठिकाणी नाकेबंदी करून दारू वाहतुकीला आळा घातला. एवढेच नाही तर काही ठिकाणी सराईत दारू विक्रेत्यांना मतदान होईपर्यंत तडीपार करण्यात आले. परिणामी बºयाच प्रमाणात दारू वाहतूक आणि विक्रीवर आळा बसला.
विशेष म्हणजे पोलीसच नाही तर वाहनांमधून रोकड वाहतूक केली जाते का याचीही तपासणी अनेक पथकांकडून होत असल्याने दारू वाहतूक करणे कठीण झाले. दारूचा पुरवठा करणारी अनेक वाहने पकडल्या जाऊन दारू विक्री जवळजवळ बंद होती.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी विविध यंत्रणांचा योग्य वापर करून कठीण वाटत असलेले हे काम सोपे करून निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यात यश मिळविले.
आॅपरेशन हिंमत’मुळे वाढला मतांचा टक्का
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात मतदानाची अंतिम टक्केवारी ७१.९८ टक्के झाली. पहिल्या टप्प्यात विदर्भात झालेल्या मतदानात ही टक्केवारी सर्वाधिक आहे. नक्षलग्रस्त भाग असताना हे कसे शक्य झाले? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
नक्षलदृष्ट्या संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल असलेल्या भागातील मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडणे मोठे आव्हानात्मक होते. अशा स्थितीत नक्षलवाद्यांच्या कारवाया यशस्वी होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘आॅपरेशन हिंमत’चे नियोजन केले.
उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनात आॅपरेशन हिंमत अंतर्गत दुर्गम व अतिदुर्गम भागात ५९१ गावांना ग्रामभेटी आणि ६१ जनजागरण मेळाव्यांच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती निर्माण केली.
जिल्ह्यात कार्यरत सी-६० पथक, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियनसोबत बाहेर जिल्ह्यातून १० हजार जवानांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता. मात्र तरीही दोन ठिकाणी भूसुरुंगांचा स्फोट घडविण्यात नक्षली यशस्वी झाले. त्यात चार जवानही जखमी झाले. एवढेच नाही तर मतदानावरून परतणाºया जवानांवर फायरिंगसुद्धा झाली.
अशा बिकट स्थितीतही मागे न हटता पोलीस, निवडणूक प्रशासन, केंद्रांवर ड्युटी लागलेले हजारो कर्मचारी यांनी समन्वयातून मार्ग काढत सर्व केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया राबविली. यंत्रणांच्या प्रयत्नांना नागरिकांनीही तेवढाच चांगला प्रतिसाद देत ‘आॅपरेशन हिंमत’ यशस्वी करण्यास हातभार लावला.