कत्तलीसाठी नेणारी तब्बल ४१ जनावरे पकडली
By admin | Published: July 2, 2016 01:29 AM2016-07-02T01:29:40+5:302016-07-02T01:29:40+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी गुरूवारी आपल्या कर्मचाऱ्यांसह लाखांदूर मार्गावरील गांधी नगर येथे ....
पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त : देसाईगंज पोलिसांची गांधी नगरात कारवाई
देसाईगंज : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी गुरूवारी आपल्या कर्मचाऱ्यांसह लाखांदूर मार्गावरील गांधी नगर येथे धाड टाकून कत्तलीसाठी नेण्यात येणारी एकूण ४१ जनावरे पकडून त्यांची कसायापासून सुटका केली.
देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा लाखांदूर मार्गावरील गांधीनगर येथे जनावरांची अवैधरित्या विक्री करून त्या जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती देसाईगंजचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना मिळाली. लागलीच पोलीस निरीक्षक पाटील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह गांधीनगर येथे पोहोचून चौकशी केली असता, एमएच-२७-एम-५९७० या क्रमांकाचे मिनी मेटाडोअर वाहन दिसले. या वाहनांची झडती घेतली असता, गाडीत कोंबून भरलेले लहान, मोठे नऊ बैल आढळून आले. याची किंमत २७ हजार रूपये आहे. तसेच त्याच परिसरात ३२ मोठे गाय, बैल दावणीला बांधल्याचे दिसून आले. या जनावरांची किंमत ९६ हजार रूपये आहे. देसाईगंज पोलिसांनी गांधी नगर येथून वाहनासह एकूण २ लाख ७३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी नरेश नामदेव पारधी (२८), देवचंद वासुदेव नखाते (३२) रा. गांधीनगर यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५, ५ (अ), (१), ५ (अ), (२), ५ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात देसाईगंजचे पोलीस हवालदार प्रकाश डोर्लीकर करीत आहे. पोलिसांनी पकडलेली संपूर्ण ४१ जनावरे गोरक्षा समिती ब्रह्मपुरी यांच्या सुपूर्द करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)