परजिल्ह्यातील 74 काेराेना रूग्णांनी गडचिराेलीत घेतला अखेरचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 05:00 AM2021-04-26T05:00:00+5:302021-04-26T05:00:28+5:30
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रूग्णांसाठी ऑक्सिजनची गरज भासत हाेती. भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचे बेड उपलब्ध हाेत नसल्याने हे रूग्ण गडचिराेली येथे रेफर केले जात हाेते. काही रूग्ण अतिशय गंभीर असल्याने त्यांना वाचविण्यात आराेग्य यंत्रणेला यश आले नाही व त्यांचा मृत्यू झाला. गडचिराेली जिल्ह्यात वर्षभरात ३२२ काेराेनाबाधितांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाचा संसर्ग झालेल्या दुसऱ्या जिल्ह्यातील रुग्णांना गडचिराेली जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी भरती केल्यानंतर यापैकी सुमारे ७४ रुग्णांनी गडचिराेली जिल्हा रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गडचिराेलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गडचिराेली शहरापासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, ब्रह्मपुरी व मूल तालुक्यांतील बहुतांश रूग्ण हे चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी न जाता, गडचिराेली येथेच येतात. काेराेनाच्या साथीत गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रूग्णांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी हाेती व आताही आहे.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रूग्णांसाठी ऑक्सिजनची गरज भासत हाेती. भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचे बेड उपलब्ध हाेत नसल्याने हे रूग्ण गडचिराेली येथे रेफर केले जात हाेते. काही रूग्ण अतिशय गंभीर असल्याने त्यांना वाचविण्यात आराेग्य यंत्रणेला यश आले नाही व त्यांचा मृत्यू झाला. गडचिराेली जिल्ह्यात वर्षभरात ३२२ काेराेनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यातील ७२ रूग्ण हे चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील आहेत तर दाेन रूग्ण दुसऱ्या राज्यातील आहेत. २४८ रूग्ण गडचिराेली जिल्ह्यातील आहेत.
गडचिराेलीतच ठेवला देह
काेराेनामुळे मृत्यू झाल्यास संबंधिताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. नगर परिषदेचे कर्मचारी आराेग्य विभागाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार गडचिराेली येथे अंत्यविधी करतात. यात केवळ एक ते दाेन जवळच्या नातेवाईकांना अंत्यविधीचे कार्य पार पाडण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. आपला अंत्यविधी गडचिराेलीत हाेईल, असे अनेकांना जिवंत असताना मनातही आले नसेल, मात्र काेराेनाच्या महामारीमुळे त्यांच्या मृतदेहावर गडचिराेलीतच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
मृत्यूचे सत्र सुरूच
काेराेनामुळे मृत्यूचे सत्र मागील महिनाभरापासून सुरूच आहे. ४० ते ५० वर्ष वयाेगटातील नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू हाेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संचारबंदी लागू होऊन आता १४ दिवसांचा कालावधी उलटला तरी काेराेनाबाधितांची संख्या कमी न हाेता वाढतच आहे.