विकासासाठी आसुसली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:01 AM2018-09-27T01:01:35+5:302018-09-27T01:02:16+5:30
आदिवासीबहुल, दुर्गम क्षेत्रासोबतच नक्षलवादाने ग्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाला भरपूर वाव आहे. मात्र जिल्ह्याबाहेरील नागरिकांमध्ये या जिल्ह्याविषयी असलेला गैरसमज आणि पर्यटनाला वाव देण्यासाठी योग्य मार्केटिंगचा अभाव यामुळे या पर्यटनस्थळांचा हवा तसा विकास अद्याप झालेला नाही.
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासीबहुल, दुर्गम क्षेत्रासोबतच नक्षलवादाने ग्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाला भरपूर वाव आहे. मात्र जिल्ह्याबाहेरील नागरिकांमध्ये या जिल्ह्याविषयी असलेला गैरसमज आणि पर्यटनाला वाव देण्यासाठी योग्य मार्केटिंगचा अभाव यामुळे या पर्यटनस्थळांचा हवा तसा विकास अद्याप झालेला नाही. परिणामी नक्षली कारवाया नियंत्रणात असल्या तरी पर्यटकांना या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे आकर्षित करण्यात प्रशासनाला अपेक्षित यश आलेले नाही.
जिल्ह्यातील पुरातन मंदिरांपैकी मार्र्कंडा येथील मार्र्कंडेश्वराचे मंदिर ब वर्ग पर्यटनस्थळात आहे. याशिवाय इतर ३२ स्थळे क वर्ग पर्यटनस्थळाच्या यादीत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात (२०१७-१८) मध्ये जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांवर सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून काही ठिकाणी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. याशिवाय चालू आर्थिक वर्षात जवळपास ५ कोटी खर्च करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.
मार्कंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. त्या ठिकाणी टॅक्सी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, निरीक्षण मनोरा, नदी किनाऱ्याचा विकास, सुलभ शौचालय, बंद गटार फुटपाथ व नदीमध्ये साकव आदी कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय पोचमार्गाचे बांधकाम, रिसॉर्ट/कॉटेज इमारत, जाहीरात पोर्टल, गेट व सुरक्षा कक्ष बांधकाम आणि पाण्यातील खेळ व नौकाविहाराची सुविधा होणार आहेत.
आरमोरी तालुक्यातील वैरागडचा किल्ला, डोंगररांगांनी वेढलेले निसर्गरम्य देऊळगाव, डोंगरावर असलेले खोब्रामेंढाचे मारूती मंदीर, अहेरी तालुक्यातील व्यंकटापूरचे बालाजी मंदीर, महाभारताचा संदर्भ असलेले लख्खामेढा, कोरची तालुक्यातील गोंड राजा पुरमशहाचे टिप्पागड, महादेवाच्या शिवलिंगासाठी धानोरा तालुक्यातील भवरागड, आदिवासी लोकांचे आराध्य दैवत झाडापापडा, गोदावरी व इंद्रावती नद्यांचा संगम असलेले सिरोंचा तालुक्यातील सोमनूर, दर बारा वर्षांनी भरणाºया पुष्कर यात्रेचे स्थळ नगरम, हैदरशहा दर्गा, चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्य, क्रांतीकारी वीज बाबूराव शेडमाके यांचे स्मारक असलेले घोट, आपापल्लीचे वनवैभव, भामरागड, सुरजागड, मुलचेराचे बौद्ध स्तूप, सेमाना मंदीर, कुरखेडाचे कृषी पर्यटन केंद्र ही स्थळे आकर्षण आहेत.
कमलापूर पर्यटनस्थळासाठी प्रयत्न करणार-पालकमंत्री
अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पची अजूनही शासनाकडे पर्यटनस्थळ म्हणून नोंद नाही. ते पर्यटकनस्थळ घोषित करण्याकरिता आपण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व अधिकाºयांशी चर्चा करणार. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा प्राधान्याने मांडून पर्यटनस्थळ घोषित होण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन वनराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी कमलापूूर येथील शिष्टमंडळाला दिले. कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये महावत व चाराकटरची रिक्तपदे भरण्याकरिता कार्यवाही व्हावी, यासाठीही पुढाकार घेणार, असे पालकमंत्री आत्राम यांनी शिष्टमंडळातील युवकांशी बोलताना सांगितले.
वनकायद्याच्या कचाट्यात रखडला विकास
जिल्ह्याचा ७६ टक्के भूभाग वनांनी आच्छादला आहे. त्यामुळे बहुतांश पर्यटनस्थळांच्या विकासासाठी वनकायद्याचे पालन करावे लागत आहे. याशिवाय नक्षलग्रस्त जिल्हा ही प्रतिमाही चिकटलेली आहे. त्यामुळे पर्यटकांना या पर्यटनस्थळांकडे खेचून आणण्यासाठी प्रशासनाला प्रामाणिक प्रयत्नांसोबत योग्य पद्धतीने मार्केटिंग करावे लागणार आहे. पर्यटकांचा ओघ जिल्ह्याकडे वाढल्यास या जिल्ह्याच्या बाबतीत असलेला गैरसमज दूर होण्यासोबतच रोजगार निर्मितीलाही मदत होणार आहे.