कुरखेडा तालुक्यातील पर्यटनस्थळे दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:37 AM2021-01-23T04:37:19+5:302021-01-23T04:37:19+5:30
मोहफुलाच्या दारूची विक्री जोरात गडचिरोली : चंद्रपूरच्या दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातून होणारा दारूचा पुरवठा थांबला. त्यामुळे गडचिरोलीच्या जंगलात विविध भागात ...
मोहफुलाच्या दारूची विक्री जोरात
गडचिरोली : चंद्रपूरच्या दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातून होणारा दारूचा पुरवठा थांबला. त्यामुळे गडचिरोलीच्या जंगलात विविध भागात मोहफुलाची दारू काढण्याचा धंदा जोरात सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोहफुलाची दारू काढून ती गावागावात पोहोचविली जात आहे.
बेरोजगारांना मुद्रा कर्ज योजनेचा लाभ द्या
कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रावर कर्ज देण्याची योजना सुरू केली; मात्र या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार
गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत; मात्र मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या असूनही बंधारे योग्य नसल्याने सिंचन व्यवस्था अपुरी आहे.
नळाला तोट्या नसल्यास कारवाई करा
गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. तोटी नसल्यास संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
हेमाडपंथी शिव मंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे.अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भुयार जात असून तो भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघतो.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
राजीव गांधी सभागृहाच्या मागे घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात व दुकानातील कचराही नेऊन टाकतात. यामुळे दुर्गंधी वाढली आहे.
वाहनांच्या गतीला आवर घाला
आलापल्ली : जिल्हाभरातून प्रमुख मार्गांवर भरधाव वाहनांमुळे पहाटेच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना अपघाताचा धोका होऊ शकतो. त्यामुळे वळण मार्गावर गतिरोधक लावून वाहनांच्या गतीला आवर घालण्यात यावा. दिवसेंदिवस भरघाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. भरधाव वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
वैरागड : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत. बोगस लाभार्थ्यांची नोंदणी होऊन त्यांना लाभ मिळाला आहे. मात्र काम करणारे लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, ते नागरिक फोन करतात. मात्र सदर फोन बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुरुष नसबंदीबाबत अनेक ठिकाणी गैरसमज
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. पुरुषांमध्ये सदर कुटुंबनियोजनाच्या नसबंदीबाबत गैरसमज असल्याने ते पुढे येत नाही.
कृषिपंपांना वीज जोडणीची प्रतीक्षा
सिरोंचा : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासकीय योजनेमार्फत कृषिपंप देण्यात आले. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे सिंचन सुविधेसाठी त्यांना अडचणी येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी डिमांडची रक्कम भरली असूनही वीज जोडणीस विलंब होत आहे.
चारचाकींमुळे बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी
गडचिरोली : शहरातील पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडी बाजार या मार्गावर चारचाकी वाहनांना तसेच जड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे. नगर परिषदेने काही वर्षापूर्वी कठडे लावून बंदी घातली होती.
अतिक्रमणामुळे सिंचन क्षेत्रात घट
देसाईगंज : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तलावातील सिंचन क्षेत्रही घटत आहे.
अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
गोगावनजीकचे नागोबा देवस्थान दुर्लक्षित
गडचिरोली : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन किमी अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. त्यामुळे येथे सोयीसुविधा द्याव्यात.