दुष्काळाच्या सावटात पर्यटन करणाऱ्या जि. प. सदस्यांवर मतदारांचा रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2015 02:08 AM2015-10-17T02:08:49+5:302015-10-17T02:08:49+5:30
जिल्ह्यात यंदा प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस अनियमित झाल्याने धानपीक हातून गेले आहे.
गडचिरोली : जिल्ह्यात यंदा प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस अनियमित झाल्याने धानपीक हातून गेले आहे. ज्या पिकाचे उत्पादन होणार आहे. त्याचा उताराही कमी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यातही वाढत असताना गडचिरोली जिल्हा परिषदेचे अनेक जिल्हा परिषद सदस्य मागील दोन महिन्यांपासून मतदार संघात फिरलेसुद्धा नाहीत. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याने शेतकऱ्यांचे दु:ख जाणले नाही. दोन महिने केवळ अविश्वासाच्या नाट्यात सदस्य केरळ, तामिळनाडू राज्याचा दौरा करून आले. करोडो रूपयांचा चुराडा या दौऱ्यावर झाला, अशी माहिती पुढे आल्याने अनेक सदस्यांना मतदार संघात मतदारांसमोर तोंड दाखवायला जागाही उरलेली नाही. त्यामुळे या सदस्यांप्रती मतदार संघात प्रचंड रोष असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यातून सध्या ५० जिल्हा परिषद सदस्य विराजमान आहेत. हे सारे सदस्य ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणारे जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. १० हजार मतदारांमधून निवडून आलेला हा जनसेवक लोकांचे प्रश्न सोडविण्याचा मुख्य केंद्रबिंदू आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा पाऊस अत्यल्प झाला. शेतकरी नापिकी व पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावाने हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मागील दोन महिन्यांपासून त्याचे दु:ख जाणण्यासाठी एकही जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या शेतापर्यंत पोहोचलेला नाही. जिल्हा परिषदेत मागील दोन ते तीन महिन्यांपासून एकही बैठक जनहिताच्या प्रश्नावर झालेली नाही. केवळ अविश्वासाचे नाट्यच दोन महिन्यांपासून सुरू आहे. २०१२ मध्ये निवडून दिलेल्या अनेक जिल्हा परिषद सदस्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सुधारल्याचेही मतदारांना दिसून येत आहे. हा सर्व प्रकार मतदारांचीच मती गुंग करणारा आहे. दुष्काळाच्या सावटात आपले अश्रू पुसण्याऐवजी मजा मारणारे हे लोकप्रतिनिधी जनतेचे खरे सेवक आहेत काय, अशी भावना लोकांमध्ये दिसून येत आहे.