ट्रॅक्टरची जिल्हाकचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:13 AM2018-03-04T01:13:18+5:302018-03-04T01:13:18+5:30
गौण खनिज खननावर शासनाने लावलेल्या जाचक अटी रद्द कराव्या या मुख्य मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टरचा मोर्चा काढण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : गौण खनिज खननावर शासनाने लावलेल्या जाचक अटी रद्द कराव्या या मुख्य मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टरचा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिल्हाभरात जवळपास ३०० ट्रॅक्टर सहभागी होते.
महाराष्ट्र शासनाने १२ जानेवारी २०१८ रोजी गौण खनिज वाहतुकीसंदर्भात कायदा केला आहे. यामध्ये रेती किंवा इतर गौण खनिजाची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित ट्रॅक्टवर सुमारे एक लाख रूपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. या अधिनियमानुसार गडचिरोली शहरात कारवाई सुद्धा करण्यात आली. सदर कायदा रद्द करावा, रेती घाट घेण्यापूर्वी ज्या शर्ती व अटी होत्या, त्याच लागू कराव्या, नक्षलग्रस्त भागातील व जंगलातील रेती घाटांवर नेटवर्क राहत नाही. त्यामुळे इन्व्हॉईस नंबर मिळण्यास अडचण होते. रेतीघाटावर जीपीएस व सीसीटीव्ही शासनाने स्व:खर्चाने लावावी, टीपीचा कालावधी एक तासाने वाढवावा, मुरूमाची परवानगी घेताना वाहनाच्या क्रमांकाची अट नसावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष देवतळे, नगरसेवक सतीश विधाते, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्राध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. यावेळी ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष एजाज शेख, उपाध्यक्ष संतोष लांजेवार, सचिव दिनेश आकरे, कोषाध्यक्ष प्रफुल चापले, संजय वडेट्टीवार, रणजीत ओल्लालवार, रोशन भांडेकर, दिवाकर चापले, जितू भांडेकर आदी उपस्थित होते.