रेल्वेच्या निर्माणाधीन कामामुळे वाहतूक प्रभावित
By admin | Published: July 3, 2016 01:24 AM2016-07-03T01:24:03+5:302016-07-03T01:26:20+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थान असलेल्या वडसा रेल्वेस्थानकावर दुसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरू असल्याने ...
अडचण : रेल्वे स्थानकावरील बांधकाम साहित्य आणणाऱ्या रेल्वेगाड्याही वाढल्या
देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थान असलेल्या वडसा रेल्वेस्थानकावर दुसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरू असल्याने तासागणिक रेल्वे फाटक बंद होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी मागील पाच वर्षांपासून भूमिगत रेल्वे पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. परंतु भूमिगत पुलाच्या कामाची गती अतिशय मंद असून भूमिगत पुलाचा प्रश्न अधांतरीत आहे. या वर्षात देसाईगंज रेल्वेस्थानकावर अनेक सोयीसुविधा मंजूर झाले आहेत. यामध्ये विश्रामगृहाजवळील मागील पुलाचे बांधकाम, नवीन प्लॉटफार्म, रेल्वेपटरीचे विस्तारीकरणासाठी माती, दगड, मुरूम याचा भराव टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच नवीन प्रस्तावित रेल्वे पटरीचे काम सुरू असल्याने याकरिताही लोहापासून गिट्टीपर्यंत सर्वच रेल्वेने आणण्यात येत आहे. त्यामुळे दिवसा अनेक रेल्वे गाड्या येतात. दिवसाला २५ ते ३० वेळा रेल्वे फाटक बंद होते. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. हे शहर रेल्वे मार्गामुळे दोन भागात विभागले आहे. बाजारपेठ, शाळा, कॉलेज पेट्रोल या साऱ्या बाबी एका बाजुला आहे. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या बाजुला जाण्यासाठी तसेच विद्यार्थी व विद्यार्थ्यांनाही ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. रोजच वाहतूक प्रभावित होत असून रेल्वे विभागाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. या ठिकाणी नागरिकांची होत असलेली कसरत पाहण्यासारखी आहे. येथे यापूर्वी अनेक अपघातही होतात. वाहतूक सुरळीत होण्यासाठी रेल्वे विभागाने सुरक्षा गार्ड तैनात करावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)