दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाने बॅरिकेट तोडले, पण...
By संजय तिपाले | Published: March 30, 2023 06:17 PM2023-03-30T18:17:27+5:302023-03-30T18:20:42+5:30
तस्कर शंकर अण्णाला पोलिसांचा दणका: अंधारात सव्वाशे किलोमीटर रंगला पाठशिवणीचा खेळ
गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत शेजारील चंद्रपूरहून चोरीछुपे दारूची तस्करी करणाऱ्या शंकर अण्णा रॉय याच्या जीपने पोलिसांचे बॅरिकेट तोडून धूम ठोकली. अंधाऱ्या रात्री पुढे दारूची जीप तर मागे पोलिस असा पाठशिवणीचा खेळ तब्बल सव्वाशे किलोमीटरपर्यंत रंगला. अखेर पोलिसांनी जीप पकडलीच. यावेळी चालकाने पोबारा केला तर त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या.
स्थानिक गुन्हे शाखेने २९ मार्चला रात्री सोनापूर (ता. चामोर्शी) येथे ही कारवाई केली. शंकर अण्णा रॉय, चालक राकेश मशीद व अमित बारई यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा व दारू तस्करीच्या कलमान्वये चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. शंकर आण्णा या तस्कराने चंद्रपूरहून मालवाहू जीपमधून दारू मागविल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी हरणघाट मार्गावर २९ रोजी रात्री सापळा लावला. शंकर आण्णाची दारूची जीप वेगात आली व पोलिसांच्या इशाऱ्याला न जुमानता बॅरिकेटला धडक देऊन सुसाट गेली. गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी सव्वाशे किलोमीटर पाठलाग करून जीप पकडली.
सोनापूरमध्ये जीप उभी करून चालकाने ठोकली धूम
चालक राकेश मशीद (रा. गौरीपूर, ता. चामोर्शी) याने चामोर्शी व आष्टी येथील विविध गावांत जीप फिरवून पोलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनीही त्याचा पिच्छा सोडला नाही. अखेर सव्वाशे किलाेमीटर पाठलाग करून जीप चामोर्शी हद्दीतील सोनापूर येथे पकडली. यावेळी जीप उभी करून चालक राकेश मशीद याने अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली तर त्याचा साथीदार अमित बारई हा पोलिसांच्या हाती लागला. १४ लाखांची देशी-विदेशी दारू व मालवाहू जीप असा एकूण १७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. शंकर अण्णा रॉयसह चालक राकेश मशीद यांचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे पो.नि. उल्हास भुसारी यांनी सांगितले.