अहेरीत निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
By Admin | Published: October 28, 2015 01:43 AM2015-10-28T01:43:54+5:302015-10-28T01:43:54+5:30
अहेरी नगर पंचायत व काही ग्राम पंचायतींची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी निवडणूक विभागाच्या मार्फतीने तयारी सुरू केली ...
अहेरी : अहेरी नगर पंचायत व काही ग्राम पंचायतींची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी निवडणूक विभागाच्या मार्फतीने तयारी सुरू केली असून याचाच एक भाग म्हणजे नगर पंचायतीच्या भवनात निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण देण्यात आले.
अहेरी नगर पंचायतीत एकूण १७ प्रभागांकरिता २० मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यात ८० निवडणूक अधिकारी व दोन झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबरोबर रेपनपल्ली व कमलापूर या दोन ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, बोरी ग्राम पंचायतीची पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी नऊ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून ३६ निवडणूक अधिकारी व दोन झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दामरंचा व येरमणार येथील निवडणुका बिनविरोध झाल्या. तर पल्ले ग्राम पंचायतीत एकही आवेदनपत्र सादर झाले नाही.
निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी टी. एस. राऊत व तलाठी एकनाथ चांदेकर यांनी पॉवर पार्इंटद्वारे प्रशिक्षण दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार एस. आर. पुप्पलवार, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार (निवडणूक) सत्यनारायण सिलमवार, ग्राम पंचायत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टी. एस. राऊत व सहायक अधिकारी म्हणून तलाठी एकनाथ चांदेकर काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)