देसाईगंज तालुक्यात कार्यक्रमांची रेलचेल सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:37 AM2021-04-27T04:37:34+5:302021-04-27T04:37:34+5:30
ग्रामीण भागासह शहराच्या विविध वाॅर्डात कोरोना नियमांची अक्षरशः ऐसीतैसी करत मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे, वाढदिवस, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व ...
ग्रामीण भागासह शहराच्या विविध वाॅर्डात कोरोना नियमांची अक्षरशः ऐसीतैसी करत मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे, वाढदिवस, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व इतरही कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात येत आहेत. लोकमतने १३ मार्च राेजी ‘देसाईगंज शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने लागलीच आठवडी बाजार, आयटीआय मैदानावर नेला. तरी गुजरी बाजारात काहीअंशी लोक विक्रीसाठी बसतातच. बाधित रुग्ण शोधमोहीम ठप्प झाली आहे. परिणामी याचा संसर्ग वाढतच जात आहे. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने कोरोनाचा उद्रेक होत आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येला सेवा देताना आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक उडत आहे. गंभीर रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू हाेत आहे. दुकान, लग्नसोहळा, धार्मिक, सामाजिक व राजकीय कार्यक्रमांत होणाऱ्या गर्दीला आवाक्यात ठेवण्याचे प्रयत्नच हाेत नसल्याचे दिसून येेत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. प्रशासकीय यंत्रणेने वेळीच जागरूक हाेऊन कार्यवाही करण्याची गरज आहे.