दोन लाख नागरिकांचे प्रथमच बँकेतून व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:14 AM2019-07-26T00:14:30+5:302019-07-26T00:16:45+5:30
पाच वर्षांपूर्वी, म्हणजे १५ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्रातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत दुर्गम व ग्रामीण भागातील सुमारे २ लाख ३७ हजार २७१ नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पाच वर्षांपूर्वी, म्हणजे १५ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्रातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत दुर्गम व ग्रामीण भागातील सुमारे २ लाख ३७ हजार २७१ नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. या माध्यमातून सदर नागरिक प्रथमच बँकेसोबत जोडल्या जाऊन त्यांचे व्यवहार बँकेमार्फत सुरू झाले आहे.
शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. लाचखोरीला आळा घालण्यासाठी अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. मात्र अनेकांकडे बँक खाते नसल्याने अनुदानाची रक्कम जमा करण्यास अडथळा निर्माण होत होता. यावर उपाय म्हणून शासनाने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शुन्य बचतीवर बँक खाते काढण्याची सक्ती बँकांना केली. प्रत्येक बँकेला बँक खाते काढण्याचे उद्दिष्टसुध्दा निश्चित केले. मागील चार वर्षांपासून याचा केंद्र शासनामार्फत आढावा घेतला जात आहे. योजनेच्या सुरूवातीपासून काही दिवस अगदी आठ दिवसात आढावा घेतला जात असल्याने बँकेची यंत्रणा कामाला लागली होती. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे बँकेचे खाते नसल्याने जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यास बराच वाव होता. त्याचा फायदा घेत मागील पाच वर्षात या योजनेंतर्गत २ लाख ३७ हजार २७१ बँक खाती उघडण्यात आली आहेत. योजनेची घोषणा झाल्यानंतर पहिल्या वर्षी बँक कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन या योजनेतंर्गत खाते काढण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर मात्र या योजनेकडे आता शासनासह बँकानीही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नवीन खाते काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
बँकाची संख्या वाढविण्याची गरज
बँकाचे व्यवहार वाढविण्यासाठी जिल्ह्यात बॅँकांची संख्या वाढविण्याची गरज आहे. भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, कोरची यासह इतरही तालुक्यांमध्ये लोकसंख्या व भूभागाचा विस्तार या तुलनेत बँकांची संख्या अतीशय कमी आहे. बँकांची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
दुर्गम भागातील नागरिक सेवेपासून वंचित
गडचिरोली जिल्ह्याचा विस्तार व लोकसंख्येच्या तुलनेत बँकांची संख्या कमी आहे. काही तालुक्यातील गावांपासून बँक ५० ते ६० किमी अंतरावर आहे. दुर्गम भागात वाहतुकीची साधने नाहीत. त्यामुळे ५० किमी अंतरावर जाऊन परत येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक नागरिकांनी अजुनही बँक खाते काढले नाही. बँक खाते नसल्याने निराधार योजना व इतर योजनांचा लाभ घेण्यास त्यांना अडचण जात आहे. त्यामुळे बँकांची समस्या वाढविणे गरजेचे आहे.
बँकेचे खाते नसल्याने बँकेत बचत करण्यास काहीच मुभा नव्हती. अनेकांना बँकेतून पैसे काढणे व पैसे भरण्याचे व्यवहार समजत नव्हते. जनधनच्या माध्यमातून नागरिकांनी बँकेचे खाते काढले. खाते झाल्यामुळे आता नागरिकांना बँकेचे व्यवहार कळण्यास सुरूवात झाली आहे. तसेच बँक खात्यात काही प्रमाणात बचतसुध्दा केली जात आहे. या माध्यमातून नागरिकांना बचतीची सवय लागली आहे. जनधन योजनेचा हा सर्वात मोठा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना झाला आहे.