कृषी महाविद्यालय इमारतीचे हस्तांतरण रखडले
By admin | Published: March 23, 2017 12:57 AM2017-03-23T00:57:58+5:302017-03-23T00:57:58+5:30
गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून गडचिरोली येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले.
दीड वर्षापासून इमारत तयार : देयकाचे चार कोटी ६५ लाख शासनाकडे प्रलंबित
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून गडचिरोली येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. सदर काम दीड वर्षापूर्वीच पूर्णत्वास आले. मात्र संबंधित कंत्राटदाराचे ४ कोटी ६५ लाख रूपयांचे देयके प्रलंबित असल्याने सदर कृषी महाविद्यालयाची इमारत हस्तांतरित करण्यात आली नाही. गेल्या वर्षभरापासून या प्रश्नाकडे राज्य सरकारचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
गडचिरोली येथील शासकीय कृषी महाविद्यालय हे कृषी विज्ञान केंद्राच्या इमारतीत सुरू आहे. या महाविद्यालयात एकूण २७० विद्यार्थी यंदाच्या शैक्षणिक सत्रात शिक्षण घेत आहेत. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक हॉल, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वाचनालय तसेच इतर सोयीसुविधा या कृषी विज्ञान केंद्राच्या इमारतीत नाहीत. त्यामुळे कृषी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री पाटील यांनी गडचिरोली येथे इमारत मंजूर करून घेतली. कोट्यवधी रूपयांच्या निधीतून ही इमारत पूर्णत्वास आली आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराचे ४ कोटी ६५ लाखांचे देयके अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे विद्युतीकरणासह सर्व कामे पूर्ण होऊनही ही इमारत हस्तांतरीत झाली नाही. त्यामुळे २५० वर विद्यार्थ्यांना अपुऱ्या इमारतीत कृषीचे शिक्षण घ्यावे लागत आहे. तोकड्या इमारतीमुळे येथे प्राध्यापकांनाही अडचण जाणवत आहे.