जीएनएम इमारतीचे हस्तांतरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:34 PM2018-08-02T23:34:27+5:302018-08-02T23:35:13+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षणासाठी महाविद्यालय व वसतिगृहाच्या प्रशस्त इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र या इमारतींचे हस्तांतरण रखडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षणासाठी महाविद्यालय व वसतिगृहाच्या प्रशस्त इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र या इमारतींचे हस्तांतरण रखडले आहे.
गडचिरोली येथे एएनएम (आॅक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी) चे प्रशिक्षण महाविद्यालय होते. मात्र जीएनएम अभ्यासक्रमाची सोय नव्हती. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर यावर्षी जीएनएम अभ्यासक्रम सुरु करण्यास मेडिकल कॉन्सिलने परवानगी दिली आहे. जीएनएम अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची प्रक्रिया जवळपास पार पडण्याच्या मार्गावर आहे. जीएनएम अभ्यासक्रमासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात महाविद्यालय व वसतिगृहाच्या प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. इमारत बांधकाम पूर्ण होऊन जवळपास सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र कंत्राटदाराचे जवळपास १० कोटी रूपयांचे बिल रखडले आहे. त्यामुळे इमारतीचे हस्तांतरण रखडले आहे. यावर्षीपासून जीएनएम अभ्यासक्रमाची पहिली बॅच सुरू होत आहे. त्यामुळे महाविद्यालयाची इमारत हस्तांतरित होणे आवश्यक होते.
सद्य:स्थितीत एएनएम महाविद्यालयाच्या इमारतीतच जीएनएमचे प्रशिक्षण सुरू करावे लागणार आहे. एएनएम महाविद्यालयाची इमारतही फारशी मोठी नाही. त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना प्रशिक्षण देताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. इमारतीचे हस्तांतरण होण्यासाठी कंत्राटदाराला कामाचे बिल देणे हाच एकमेव उपाय आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. कृषी महाविद्यालयाची इमारत बांधून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र कंत्राटदाराचे बिल रखडल्याने कोट्यवधी रूपयांची इमारत धूळखात आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या लहानशा इमारतीत कृषी महाविद्यालय भरविले जात आहे. हीच बाब जीएनएम महाविद्यालयाच्या इमारतीबाबत होणार नाही, यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
प्रवेश प्रक्रिया आटोपण्याच्या मार्गावर
जीएनएम अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन संबंधित उमेदवारांनी प्रवेश घेण्याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे. यावर्षी प्रथम वर्षाला १० प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पुढील वर्षीपासून प्रथम वर्षाला २० प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सदर अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे.
बेड संख्या वाढविण्याचा प्रस्ताव
जिल्हा सामान्य रुग्णालयाची बेड क्षमता सद्य:स्थितीत २८६ एवढी आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन ३५० बेड संख्या वाढवून मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा रुग्णालयातर्फे शासनाकडे सादर केला आहे.