एटापल्लीच्या शवागार इमारतीचे हस्तांतरण रखडले
By admin | Published: February 11, 2016 12:09 AM2016-02-11T00:09:00+5:302016-02-11T00:09:00+5:30
स्थानिक ग्रामीण रूग्णालय परिसरात मागील दोन वर्षापासून रूग्णालय परिसरातील खुल्या आवारात महिला व पुरूष मृतदेहाचे उघड्यावर शवविच्छेदन केले जात आहे.
उघड्यावरच करावे लागते विच्छेदन : ३० लाखांचा निधी झाला खर्च
एटापल्ली : स्थानिक ग्रामीण रूग्णालय परिसरात मागील दोन वर्षापासून रूग्णालय परिसरातील खुल्या आवारात महिला व पुरूष मृतदेहाचे उघड्यावर शवविच्छेदन केले जात आहे. तब्बल ३० लाख रूपये खर्च करून शवविच्छेदन तथा शवागाराची सुसज्ज इमारत उभारण्यात आली. मात्र दोन वर्ष उलटूनही सदर इमारत ग्रामीण रूग्णालयास हस्तांतरित करण्यात आली नाही. त्यामुळे सध्या शवविच्छेदन उघड्यावर केले जात असून नवी इमारत शोभेची वस्तू बनली आहे.
एटापल्लीतील शवविच्छेदनाची जुनी इमारत जीर्ण झाल्याने वर्षभर मृतदेहाचे शवविच्छेदन उघड्यावर सुरू होते. त्यानंतर गतवर्षी रूग्णालय परिसरात सर्व सोयीसुविधायुक्त प्रशस्त शवागार व शवविच्छेदन गृहाची इमारत बांधण्यात आली. या इमारतीत शवविच्छेदनासाठी एक खोली, वैद्यकीय अधिकाऱ्यांकरिता एक कक्ष, शौचालय, प्रसाधनगृह व शवविच्छेदन मशीन ठेवण्यासाठी एक मोठी खोली आहे. मात्र या इमारतीत विद्युत जोडणी करण्यात आली नाही. या शुल्लक कारणामुळे सदर इमारत रूग्णालय प्रशासनास हस्तांतरीत करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून शवागाराच्या इमारतीखाली उघड्यावर मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून असाच कारभार सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)