बदली झालेले कर्मचारी भारमुक्त नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:39 AM2021-09-18T04:39:38+5:302021-09-18T04:39:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : राज्य शासनाच्या ९ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने २७ ते ३१ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : राज्य शासनाच्या ९ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने २७ ते ३१ जुलै २०२१ दरम्यान कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया समुपदेशनाने पार पडली. या बदली प्रक्रियेत १५ टक्केच्या नियमानुसार जवळपास २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी रिलिव्हर न आल्याने त्यांना भारमुक्त करण्यात आले नाही. परिणामी बदली हाेऊनही जवळपास सव्वाशे कर्मचारी जुन्याच आस्थापनेच्या ठिकाणी काम करीत आहे.
जि.प.प्रशासनाने २७ ते ३१ जुलैदरम्यान विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया समुपदेशनाने करण्याची कार्यवाही जि.प.च्या राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृहात पार पाडण्यात आली. २८ जुलैला महिला व बालकल्याण, सिंचन, बांधकाम, पशुसंवर्धन व कृषी आदी पाच विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. २९ जुलैला आराेग्य विभाग, यांत्रिकी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच ३० जुलै राेजी आराेग्य विभागातील आराेग्य सहायक, औषध निर्माण अधिकारी, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ व आराेग्य पर्यवेक्षकांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या. तसेच ३१ जुलै राेजी पंचायत विभाग, शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या बदल्या करण्यात आल्या. याच कालावधीत ग्रामसेवकांच्याही बदल्या करण्यात आल्या.
१५ टक्केच्या नियमानुसार जि.प.अंतर्गत एकूण २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यापैकी निम्मे कर्मचारी बदलीच्या नवीन ठिकाणी रुजू झाले आहे. ५० टक्के म्हणजे १२५ कर्मचारी अजूनही नवीन ठिकाणी रुजू हाेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याचे कारण संबंधित अधिकाऱ्यांनी रिलिव्हर न आल्याने बदली हाेऊनही कर्मचाऱ्यांना साेडले नाही. परिणामी १०० वर कर्मचारी स्थानांतरण हाेऊनही अजूनही रुजू हाेऊ शकले नाही. गटविकास अधिकाऱ्यांकडून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यास दिरंगाई हाेत आहे.
बाॅक्स...
जि.प. सीईओंच्या आदेशाची अवहेलना
n बदली झालेल्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना १० ऑगस्ट २०२१ पर्यंत भारमुक्त करावयाचे हाेते. तसेच ग्रामसेवकांना ३१ ऑगस्टपर्यंत भारमुक्त करायचे हाेते. मात्र बीडीओ रिलिव्हर आला नाही, या कारणावरून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही भारमुक्त केले नाही. परिणामी बदलीच्या नवीन ठिकाणी रुजू हाेण्याकरिता १०० वर कर्मचाऱ्यांना गेल्या १५ दिवसांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी सीईओंच्या आदेशाला खाे मिळत आहे.
n जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या स्वाक्षरीने कर्मचाऱ्यांचे बदली आदेश काढण्यात आले. त्यामध्ये बदली कर्मचाऱ्यांचे नाव, सध्याचे कार्यरत ठिकाण व स्थानांतरण झालेले ठिकाण आदीसह भारमुक्तीच्या दिनांकाचा उल्लेख आहे.
बाॅक्स...
पाच तालुक्याला पसंती नाही
जिल्हा परिषदेच्या विविध विभागासह महसूल तसेच वन व इतर सर्व विभागाचे कर्मचारी सुगम भागात नाेकरी करण्यासाठी पसंती देतात. तर अहेरी, सिराेंचा, एटापल्ली, भामरागड, काेरची या दुर्गम तालुक्यात कर्मचारी सेवा देण्यास फारसे तयार हाेत नाही. बदली झाली तरी प्रतिनियुक्ती घेऊन पुन्हा शहरी व सुगम भागात येतात.