तथागत भगवान गौतम बुध्दाचा धम्म घराघरांत पोहोचवा
By admin | Published: March 14, 2016 01:24 AM2016-03-14T01:24:41+5:302016-03-14T01:24:41+5:30
१४ आॅक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या घटनेला आता ६० वर्ष पर्ण होत आहेत.
भदन्त श्रीपाद यांचे आवाहन : बौद्ध धम्म परिषद; डॉ. आंबेडकर यांचे विचार समजून घेण्याची गरज
गडचिरोली : १४ आॅक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या घटनेला आता ६० वर्ष पर्ण होत आहेत. तथागत गौतम बुद्धाचा धम्म हा भारतातून श्रीलंका, जापान, कोरिया, चीन आदी देशात पोहोचला. त्यामुळेच या देशाचा विकास झाला. मात्र भारतात सर्वदूर हा धम्म पोहोचला नाही. भारताला समृद्ध, सशक्त व प्रगतशील करण्यासाठी बौद्ध धम्म घराघरात पोहोचवा, असे आवाहन अमरावतीचे भदन्त श्रीपाद यांनी केले.
स्थानिक संस्कृती सांस्कृतिक भवनात रविवारी आयोजित बौद्ध धम्म परिषदेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त सत्यानंद महाथेरो होते. उद्घाटक म्हणून नागपुरचे डॉ. राजाभाऊ टाकसाळे, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. विजय रामटेके उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून छत्तीसगडचे माजी मंत्री छबीलाल रात्रे, अॅड. शांताराम उंदीरवाडे, विनय बांबोळे, सिद्धार्थ ढोके, प्रा. डॉ. राजकुमार शेंडे, दिवाकर बारसागडे, संतोष रामटेके, माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, मुनिश्वर बोरकर, प्रफुल रामटेके, चांगदास मसराम तसेच भदन्त कृपाशरण महाथेरो, भदन्त सुमनवन्नो महाथेरो, भदन्त कुरूणाबोधी महाथेरो, भदन्त अभय आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना भदन्त श्रीपाद म्हणाले, बौद्ध भिख्खू संघाच्या वतीने सन २०१७ मध्ये दिल्ली येथे बुद्धगया मुक्ती आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी बौद्ध समाज बांधवांनी आतापासूनच जागृत होऊन आपला विकास, संस्कार व संस्कृतीच्या या लढाईत पूर्ण ताकदीनिशी उतरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार मुनिश्वर बोरकर यांनी केले. या बौद्ध धम्म परिषदेला बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
पंचशील तत्त्वानुसार आचरण करा
तथागत गौतम बुद्धाचा धम्म हा शांतीचा धम्म आहे. या धम्मातून मागासलेल्या लोकांचा विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळे बौद्ध समाज बांधवांची सध्या काही प्रमाणात प्रगती झाली आहे. मात्र तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार काही बौद्ध समाजबांधव आचरण करताना दिसून येत नाही. केवळ गोष्टी करतात. मात्र त्यांचे आचरण पंचशील तत्त्वानुसार राहत नाही. बोलण्यापेक्षा पंचशील तत्त्वानुसार प्रत्यक्ष जीवनात चारित्र्य, शीलवान आचरण ठेवा, असे आवाहन चंद्रपुरचे भदन्त धम्मचक्र यांनी केले.