मजुरीसाठी अडविले तेंदूपत्त्याचे ट्रक
By admin | Published: May 31, 2017 02:15 AM2017-05-31T02:15:01+5:302017-05-31T02:15:01+5:30
तेंदूची मजुरी न देताच तेंदूपत्ता भरून देणारे ट्रक अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथील नागरिकांनी गावाच्या सीमेवर मंगळवारी अडविले आहेत.
बोटलाचेरूवासीय आक्रमक : रक्कम दिल्याशिवाय ट्रक न सोडण्याचा निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तेंदूची मजुरी न देताच तेंदूपत्ता भरून देणारे ट्रक अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथील नागरिकांनी गावाच्या सीमेवर मंगळवारी अडविले आहेत. त्यामुळे मजुरीचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अहेरी पोलिसांनी तुळशीराम तापला, रवी मलय्या, तनकम व नागराज समय्या पुट्टा या तिघांकडून आठ दिवसांपूर्वी सुमारे पावणेदोन कोटी रूपयांची रोकड जप्त केली होती. सदर कंत्राटदार ही रोकड नक्षल्यांना देण्यासाठी नेत होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याच कारणावरून तिघांनाही अटक करून रक्कम जप्त केली आहे. मात्र सदर रक्कम अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथील तेंदू मजुरांची मजुरी देण्यासाठी नेली जात होती, असा दावा गावकरी व कंत्राटदाराच्या मार्फतीने केला जात आहे. तक्रारदाराने तेंदू हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही मजुरीची रक्कम दिली नाही. कंत्राटदारांना पोलीस कोठडी मिळाली असल्याने त्यांची चौकशी सुरू आहे. मजुरांना मजुरी देण्यासाठी आणलेले पैसे पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे मजुरीची व रॉयल्टीची रक्कम कंत्राटदाराकडून उपलब्ध होण्यास साशंकता निर्माण झाली आहे. अशातच कंत्राटदाराने मजुरी न देता ट्रकच्या माध्यमातून तेंदूपत्ता उचलण्याची तयारी सुरू केली. तेंदूपत्ता भरलेले ट्रक गावाबाहेर जात असल्याची माहिती बोटलाचेरू येथील नागरिकांना माहित होताच त्यांनी गावाच्या वेशीवरच ट्रक अडविले. जोपर्यंत तेंदूपत्त्याची रक्कम उपलब्ध होत नाही. तोपर्यंत आपण तेंदूपत्ता नेऊ देणार नाही, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. बोधाने भरलेले ट्रक गावाच्या वेशीवरच थांबवून ठेवण्यात आले आहेत. तेंदूपत्ता व मजुरीची रक्कम न मिळाल्यास गरीब नागरिक अडचणीत येणार आहेत.
तेंदूपत्त्याची रक्कम उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने मध्यस्थी करावी, अशी मागणी बोटलाचेरू येथील नागरिकांनी केली आहे.