सापळ्यांमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात
By Admin | Published: May 8, 2017 01:40 AM2017-05-08T01:40:04+5:302017-05-08T01:40:04+5:30
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे पक्षी निसर्गातील सौंदर्य व अस्तित्व राखण्यात मोलाची भूमिका बजावितात.
शिकारी वाढल्या : नदी, नाले, पाणवठ्यांवर पसरवितात जाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे पक्षी निसर्गातील सौंदर्य व अस्तित्व राखण्यात मोलाची भूमिका बजावितात. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांची सापळा रचून शिकार होत असल्याने पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र पक्ष्यांचा बचाव करण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. वनविभाग केवळ तेंदूपत्ता बोनस व गॅस वितरणातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
वनाचे व वन्यजीवांचे रक्षण करण्याचे अधिकार ज्यांना दिले आहे. ते जर उघड्या डोळ्यांनी वन व वन्यजीवांचा ऱ्हास पाहत असतील तर जीवांचे रक्षण करणार कोण, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. गावपातळीवर वन व वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांवर सोपविण्यात आली आहे. परंतु वनव्यवस्थापन समित्या अकार्यक्षम झाल्या आहेत. उन्हाळ्यात सर्वात जास्त प्रमाणात वन्यप्राणी व पक्ष्यांचे निवारे नष्ट केल्या जात आहेत.
उन्हाळ्याचा तडाखा अधिक असल्याने एप्रिल महिन्यातच जंगलातील पाणवठे नष्ट झाले आहेत. त्यामुळे जंगलातील प्राणी व पक्षीही गावाकडे धाव घेत आहेत. पाण्याच्या शोधार्थ प्राणी व पक्ष्यांचीही भटकंती होत आहे. गावाच्या आसपास असलेल्या तलाव, नदी, नाल्याच्या काठी सापळे रचून प्राणी व पक्ष्यांचीही शिकार होत आहे. अनेकदा वन्यप्राण्यांच्या शिकारी रात्रीच्या सुमारासही केल्या जातात. अनेक प्रकारची शक्कल लढवून प्राण्यांची शिकार केली जाते. परंतु शिकाऱ्यांकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याने कोणतीच कारवाई केली जात नाही. गावातील वनसमित्या केवळ नावापुरत्याच असल्याने जंगलातील जीव तर नष्ट होतच आहे. शिवाय अवैध वृक्षतोड, बांबूकटाई होत आहे. त्यामुळे वन्यजीव धास्तावलेले आहेत. वन्यजीव गावांकडे येत असल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक पक्ष्यांचे अस्तित्त्व सध्या धोक्यात असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात विविध पक्षी आहेत. परंतु विशेषत: ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यात शिकारी वाढत असल्याने त्यांचे अस्तित्त्व धोक्यात आहे.
पारवा व हारावतांचे प्रमाण घटत आहे
पाणवठ्याजवळ असलेल्या झाडांवर मोहाच्या झाडापासून काढलेले चिक ओलसर काडीला चिकटवून मांडले जाते. पाणी पिण्यासाठी येणाऱ्या पारवा, हारावत यासह अन्य पक्ष्यांची शिकार केली जाते. त्यामुळे दिवसेंदिवस महाराष्ट्राचा राज्य पक्षी असलेला हारावत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डोंगरी भागात हारावत या पक्ष्याचे वास्तव्य असते. परंतु पाणी पिण्यासाठी हारावत शक्य असलेल्या पाणवठ्यावर जातात. परंतु शिकाऱ्यांकडून पसरविण्यात आलेले सापळे पक्ष्यांच्या जीवांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. जिल्ह्यातील डोंगरी भागात हारावत पक्ष्यांचे अस्तित्व आहे. यासह पारवा पक्ष्याच्या अनेक जाती पाहायला मिळतात. परंतु शिकारीचे वाढते प्रमाण बघता अनेक पक्ष्यांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.