डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावात शिकारीसाठी सापळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:24 PM2018-05-12T22:24:11+5:302018-05-12T22:24:11+5:30
देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावांमध्ये वन्यजीवांच्या शिकारीसाठी शिकाऱ्यांनी सापळे रचले आहेत. वन्यजीवांची शिकार करताना लपून बसण्यासाठी तलावात पाण्याच्या जवळ झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावांमध्ये वन्यजीवांच्या शिकारीसाठी शिकाऱ्यांनी सापळे रचले आहेत. वन्यजीवांची शिकार करताना लपून बसण्यासाठी तलावात पाण्याच्या जवळ झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केली आहे. या ठिकाणी दरदिवशी एका प्राण्याची शिकार होत असताना या परिसरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
एप्रिल महिन्यापासून जंगलातील पाणवठे आटण्यास सुरूवात झाली आहे. वन विभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले असले तरी या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात नाही. त्यामुळे पाण्यासाठी वन्यजीवांनी गावाजवळ असलेल्या तलावांकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे. याचा गैरफायदा शिकाऱ्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. देसाईगंज तालुकास्थळापासून पूर्वेला अवघ्या आठ किमी अंतरावर शंकरपूर गावाजवळ तलाव आहे. या तलावात वन्यजीवांच्या शिकारीसाठी सायंकाळच्या सुमारास खुलेआम सापळे लावले जात आहेत. त्याचबरोबर डोंगरमेंढा येथेही तलावात सापळे लावले जात आहेत.
प्राण्यांना दिसू नये, यासाठी जलसाठ्याजवळच झाडाच्या फांद्यांच्या झोपड्या बांधल्या आहेत. या झोपड्यांमध्ये शिकारी लपून राहतात. वन्यजीव रात्री पाण्यासाठी आल्यानंतर सापळ्यात अडकतो. त्यानंतर शिकारी सदर प्राण्यास मारून त्याच्या मांसाची विक्री करतात. विशेष म्हणजे, तलावाच्या पाळीवर उभे झाले तरी शिकाऱ्यांनी तलावात बांधलेल्या झोपड्या नजरेस पडतात. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मात्र या झोपड्या कशा दिसत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वन विभागाचे कर्मचारी शिकाऱ्यांकडून चिरीमिरी घेऊन चूप असल्याचे बोलले जात आहे.
वन कर्मचाऱ्यांची जंगल गस्त कागदोपत्रीच
वन्यजीवांची शिकार होऊ नये, त्याचबरोबर जंगलतोड होऊ नये यासाठी प्रत्येक वन कर्मचाऱ्याला जंगलात गस्त घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र बहुतांश वन कर्मचारी गस्तीच्या नावावर घरी जाऊन झोपा काढत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर आहे. प्रत्येक कर्मचारी जंगलात गस्त घालतो काय, याचा दरदिवशी आढावा घेणे आवश्यक आहे.