स्मशानभूमीला कचऱ्याचा वेढा
By admin | Published: June 20, 2017 12:44 AM2017-06-20T00:44:15+5:302017-06-20T00:44:15+5:30
आरमोरी शहराजवळ रामाळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढले आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.
दुर्गंधीचा त्रास : आरमोरी नगर पंचायतचे दुर्लक्ष; आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी शहराजवळ रामाळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढले आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचा त्रास वाढला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची तत्काळ विल्हेवाट लावावी, त्याचबरोबर या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी होत आहे.
रामाळा नदीघाट रस्त्याच्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत शहरातील बौद्ध बांधव तसेच इतर समाजातील नागरिक दफनविधी करतात. शहरातील कचरा या स्मशानभूमीत टाकण्यात येत असल्याने स्मशानभूमीचा परिसर हा पूूर्णत: कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात अत्यंयात्रेतील नागरिकांना कचऱ्यामुळे दुगंर्धीचा त्रास सहन करावा लागते. मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदणाऱ्यांनासुद्धा दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
नगर पंचायत प्रशासनाने स्मशानभूमीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची उचल करून साफसफाई करावी, याबाबत नगर पंचायत प्रशासनाला अनेकवेळा निवेदन देण्यात आले. मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे.
नगर पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्मनशानभूमीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची तत्काळ उचल करावी व कचरा टाकणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. तसेच स्मशानभूमी परिसराची साफसफाई करून पाणी, विद्युत व शेडचे बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून अत्यंविधीतील नागरिकांना शोकसभा घेणे सोईचे होईल.
स्मशानभूमीतील दुर्गंधीपासून तत्काळ मुक्तता करावी, अन्यथा भारिप बहुजन महासंघाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष हसंराज बडोले यांनी दिला आहे. नगर परिषदेचे नियंत्रण न राहिल्यास या ठिकाणाची डम्पींग यार्डप्रमाणे परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच लक्ष देण्याची मागणी आहे.