राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास ठरतोय धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:10 AM2019-05-05T00:10:41+5:302019-05-05T00:10:58+5:30
गडचिरोली-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. या वर्दळीत वाहनचालकांना निश्चित ठिकाणी पोहोचण्याच्या घाईत आपला जीव गमवावा लागतो. शिवाय वाहनात असलेल्या प्रवाशांनाही अनेकदा आपल्या प्राणास मुकावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. या वर्दळीत वाहनचालकांना निश्चित ठिकाणी पोहोचण्याच्या घाईत आपला जीव गमवावा लागतो. शिवाय वाहनात असलेल्या प्रवाशांनाही अनेकदा आपल्या प्राणास मुकावे लागते. गेल्या दोन ते तीन वर्षांत या ३४ किमी मार्गावर अनेक किरकोळ व गंभीर अपघात घडल्याने अनेकांचा बळी गेला आहे. दिवसेंदिवस राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास धोक्याचा ठरत आहे.
गडचिरोली-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावरून २४ तास वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर जवळपास १० गावे रस्त्याला लागून आहेत. विशेष म्हणजे मार्गावरील एकाही गावालगत गतिरोधक नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनेही सुसाट पळविली जातात. दिवस-रात्र हा वेग कायम असतो. वाहनचालकांना निश्चित स्थळी पोहोचण्याची घाई नेहमीच राहत असल्याने किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असतात. अवजड वाहनांसह एसटी महामंडळाच्या बसेसही सुसाट चालविल्या जातात. विशेषत: परस्पर विरूद्ध दिशेने वाहने येतानाही ओव्हरटेक करून आपले वाहन समोर कशाप्रकारे नेता येईल, या हेतूने वाहने चालविली जात असल्याने अपघात घडतात. परस्पर विरूद्ध दिशेने वाहन येऊन जोरदार धडक झाल्यास गंभीर स्वरूपाचा अपघात घडतो.
गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी फाटा, गोगाव फाटा, पाल नदीलगतचे वळण त्यानंतर साखरा, काटली, नगरी फाट्यालगतचे वळण, मोहझरीलगतचे चढते वळण, पोर्ला बसथांबा, वडधा मार्ग फाटा, वसा, चुरमुरा, किटाळीलगतचे वळण, देऊळगावनजीकचे वळण, खोब्रागडी नदी पूल, वैरागड फाटा, गाढवी नदीलगतचे वळण, आरमोरी स्मशानभूमीकडे जाणारा फाटा तसेच आरमोरी शहरातील मुख्य मार्ग आदी ठिकाणे अपघातप्रवण स्थळ बनली आहेत. चार वर्षांपूर्वी साखरा, किटाळीजवळ काळीपिवळीला अपघात होऊन काही लोकांचा बळी गेला. तर काहींना गंभीर जखमी व्हावे लागले होते. देऊळगावनजीकच्या वळणावर चारचाकी वाहनाला अपघात होऊन एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना आपल्या जीवाला मुकावे लागले होते.
मागील वर्षी चुरमुराजवळ कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चारचाकी वाहन रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला रात्रीच्या सुमारास धडकल्याने सहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याशिवाय नवीन वर्षात कठाणी नदीच्या नवीन पुलावर दुचाकीला अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाला. तसेच जुन्या पुलावरून आॅटोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने आॅटो नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. या ३४ किमी मार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत असल्याने मार्ग धोकादायक ठरत आहे.
मोहझरीजवळ दीड महिन्यात दुसरा अपघात
गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील काटली-मोहझरीदरम्यान नेहमीच अपघात घडत असतात. यात किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या अपघातांचा समावेश असतो. २०१९ मध्ये २१ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात काळी-पिवळी वाहनानाची झाडाला जबर धडक बसली. यामध्ये दोघे ठार तर १२ प्रवासी जखमी झाले होते. विशेष म्हणजे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला होता. त्यानंतर आता शुक्रवार ३ मे रोजी काटलीजवळ दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान एसटी महामंडळाच्या बसने बांबू भरलेल्या ट्रकला जबर धडक दिल्याने चालकासह तिघेजण जखमी झाले. ओव्हरटेक करण्याच्या नादात सदर अपघात घडल्याचे प्रवाशांमध्ये चर्चा होती.