झाडे समाज बांधवांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:22 AM2018-06-16T00:22:50+5:302018-06-16T00:22:50+5:30
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात झाडे (झाड्या, झाडीया) जमातीच्या लोकांची लोकसंख्या मोठी आहे. मात्र जात व जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या समाज बांधवांना मोठी कसरत करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात झाडे (झाड्या, झाडीया) जमातीच्या लोकांची लोकसंख्या मोठी आहे. मात्र जात व जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या समाज बांधवांना मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने सदर समाजाच्या संशोधनासाठी समिती गठित करून प्रशासनामार्फत जात व जात वैधता प्रमाणपत्र देणे सुरू करावे, या मागणीसाठी दोन्ही जिल्ह्यातील झाडे जमातीच्या बांधवांनी १३ जूनपासून येथील गांधी वार्डाच्या चौकातील जुन्या जयस्तंभाच्या जागेवर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या संदर्भात चंद्रपूर-गडचिरोली झाडे, झाड्या तसेच झाडीया जमात समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत झाडे, झाड्या, झाडीया जमातीचे सखोल अध्ययन झाले नाही. अध्ययन करण्यासाठी एक समिती गठीत करावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात झाडे नावाने जी जमात आहे, ती शासनाने भटक्या जमातीमध्ये अनुक्रमांक २९ ची धनगर या मुक्त जातीची तत्सम जात म्हणून १५ क्रमांकावर समाविष्ट केली आहे. मात्र जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न कायम आहे. या संदर्भात शासनस्तरावर कोणता निर्णय झाला आहे, याबाबत या जमातीचे लोक अनभिज्ञ आहेत. जात व वैधता प्रमाणपत्राअभावी झाडे, झाड्या जमातीचे लोक विविध शासकीय योजनांपासून वंचित आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
धरणे आंदोलनात जमात समितीचे अध्यक्ष अनिल मंटकवार, जिल्हा सचिव पुरूषोत्तम अर्कपटलवार, अभ्यासक डॉ. सुशीलकुमार कोहाड, यमाजी तुनकलवार, सखाराम दिवटीवार, रमेश तुनकलवार, जयेंद्र बर्लावार, कमलाकर कोमलवार, किशोर येनमुले, पुंडलिक चौधरी यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले आहेत.
अनेक गावातील बांधव सहभागी
चंद्रपूर-गडचिरोली झाडे, झाड्या व झाडीया जमात समितीच्या वतीने १३ जून बुधवारपासून गांधी चौकातील जुन्या जयस्तंभाजवळ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील शेकडो समाज बांधव सहभागी झाले आहे. १३ जून रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील खेडी, उसेगाव, केरोडा, व्याहाड, उपरी, जाम, भटेजाम, सावली येथील समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले. गुरूवारी गडचिरोली जिल्ह्यातील मौशीखांब, नवेगाव, राखी, गुरवळा, विहीरगाव तर शुक्रवारी साखेरा, कारवाफा, झरी, जांभळी, राजोली, मारोडा, गिलगाव, मारकबोडी, डोंगरगाव, भाडभिडी, कुरूड आदी गावातील समाज बांधव आंदोलनात सहभागी होणार आहे. समितीच्या वतीने ठरवून दिलेल्या दिवसानिहाय दोन्ही जिल्ह्यातील समाज बांधव या आंदोलनात टप्याटप्याने सक्रीय सहभाग नोंदविणार आहेत.