एटापल्लीत वृक्ष लागवड योजनेचा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:22 AM2018-11-05T00:22:46+5:302018-11-05T00:23:24+5:30
१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा जम्बो कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र यंत्रणेच्या उदासीनतेमुळे एटापल्ली तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा जम्बो कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र यंत्रणेच्या उदासीनतेमुळे एटापल्ली तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. पंचायत समिती प्रशासनाकडे लागवडीसाठी रोपटे उपलब्ध होऊनही या रोपट्याची लागवड करण्यात आली नाही. परिणामी पं.स.च्या परिसरात ५० पेक्षा अधिक रोपटे वाळून नष्ट झाले आहेत.
संपूर्ण राज्य हरीत करण्याच्या उद्देशाने राज्याचे वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यभर वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात आली. पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात खड्डे खोदून विविध रोपट्यांची लागवड करण्यात आली. राज्य शासनाच्या या मोहिमेअंतर्गत एटापल्ली पंचायत समितीला २६० रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वनविभागाकडून २६० रोपटे उपलब्ध झाले. यापैकी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने १८३ रोपटे लावण्यात आले. उर्वरित रोपटे पं.स.परिसरातील शौचालयाजवळ तसेच मिटिंग हॉलच्या मागील परिसरात ठेवण्यात आले. सदर मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी तीन हजार रूपयांची वर्गणी जमा करण्यात आली. तर मजुरांच्या मजुरीची रक्कम शासकीय निधीतून अदा करण्यात आली. पं.स.यंत्रणेच्या वतीने वृक्षलागवड कार्यक्रमाचा कांगावा करण्यात आला. मात्र या यांत्रणेच्या वतीने लावण्यात आलेल्या एकूण झाडापैकी सद्य:स्थितीत एकही झाड जीवंत स्थितीत दिसून येत नाही.
वृक्ष लागवडीसाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले. मात्र वृक्षरोपणाबाबतची खबरदारी वनविभाग व पं.स. प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे ५० वर रोपटे कार्यालय परिसराच्या आवारात पडून राहिले. सदर रोपटे वाळून ती नष्टही झाली आहेत. प्रशासकीय अधिकारी, पं.स.चे लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेचा फज्जा उडाला. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने उद्देशाला हडताळ फासला आहे.
मूल्यमापन व देखरेखीचे काम थंडबस्त्यात
१३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात साडेपाच लाख वर रोपट्यांची विविध ठिकाणी लागवड करण्यात आली. यामध्ये सर्वच प्रशासकीय विभागांचा समावेश होता. अहेरी उपविभागातही वृक्ष लागवड मोहिमेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र लागवडीनंतर संगोपन, देखरेखीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले. दर दोन ते तीन महिन्यांनी या योजनेचा आढावा घेण्याचे राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. किती रोपटे लावले, किती जिवंत व किती नष्ट झाले याबाबतचा अहवाल तयार होणार होता. मात्र अनेक विभागांनी अशा प्रकारची माहिती तयार केली नाही. वृक्ष लागवड मूल्यमापनाचे काम थंडबस्त्यात आहे.