शेत जमिनीसाठी वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:33 AM2018-05-23T01:33:09+5:302018-05-23T01:33:09+5:30
आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोरेगाव कुरंडी बिटात शेत जमिनीसाठी वन क्षेत्रात काही लोक अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करीत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोरेगाव कुरंडी बिटात शेत जमिनीसाठी वन क्षेत्रात काही लोक अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करीत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
जास्त घनतेचा जंगल म्हणून ओळख असलेल्या या भागात वृक्षतोडीमुळे नैैसर्गिकरित्या उभे जंगल आता शेवटच्या घटका मोजत आहे. मागील काही वर्षांपासून वन विभागाने सुरू केलेले रोपवन हे वन्यजीवांसाठी शाप ठरत आहे. ज्या ठिकाणी दाट झुडूपी जंगल आहे. ते जंगल तोडून त्या ठिकाणी मानवीकृत रोपवन तयार केले जात आहे. वन्य प्राण्यांचा वावर झुडूपी जंगलात असतो. रोपवनासाठी झुडूपे, झुडूपी जंगल तोडले जाते. त्यामुळे वन्यप्राणी रस्त्यावर येतात. कुरंडी बिटातील डोंगरतमाशी जंगलात २० हेक्टर क्षेत्रात दाट जंगल तोडून रोपवन तयार करण्यात आले. तेव्हापासून या जंगलातील वन्यजीव सायंकाळच्या सुमारास गावाशेजारी येतात, असे गावकºयांचे म्हणणे आहे. डोंगरालगत असलेल्या जंगलात नेहमी प्राण्यांचा वावर असतो. वन विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे आरमोरी, पोर्ला वन परिक्षेत्रातील डोंगरतमाशी, कोरेगाव, कुकडी, मोहटोला, नरोटी, नरोटी चक या भागात बाहेरील लोकांनी वन जमिनीवर अतिक्रमण केले. जंगलाची तोड करून शेतजमिनी तयार केल्या. यामुळे जंगलाची मोठी हानी झाली.
बाहेरच्या भागात राहणाºया ज्या लोकांनी पेसा अंतर्गत क्षेत्रात जमिनी काढल्या त्या परत घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुकडी, विहीरगाव, मोहटोला, नरोटी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्यपालांना निवेदनही पाठविले आहे. मानवीकृत रोपवनाच्या नावाखाली व शेतजमिनी विकसीत करण्याच्या नावावर होत असलेली वृक्षतोड पूर्णत: थांबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.