आदिवासी नवदाम्पत्य हरखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:49 AM2018-04-30T00:49:50+5:302018-04-30T00:49:50+5:30
एकाच लग्नमंडपात तब्बल ९७ आदिवासी जोडप्यांना विवाहबद्ध करण्याचा अभूतपूर्व सामूहिक विवाह सोहळा रविवारी गडचिरोलीत पार पडला. या सोहळ्याच्या भव्य आयोजनाने विवाहबद्ध झालेले नवदाम्पत्य चांगलेच हरखून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एकाच लग्नमंडपात तब्बल ९७ आदिवासी जोडप्यांना विवाहबद्ध करण्याचा अभूतपूर्व सामूहिक विवाह सोहळा रविवारी गडचिरोलीत पार पडला. या सोहळ्याच्या भव्य आयोजनाने विवाहबद्ध झालेले नवदाम्पत्य चांगलेच हरखून गेले. त्यांच्यासाठी कल्पनेच्या पलिकडे असलेला हा सोहळा आदिवासी समाज आणि पोलीस यांच्यातील नाते अधिक घट्ट करणारा ठरला.
गडचिरोली शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन झाले. पोलीस प्रशासन, मैत्री परिवार संस्था नागपूर, धर्मदाय आयुक्त आणि साई भक्त साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त पुढाकाराने मूल मार्गावरील अभिनव लॉनवर उभारलेल्या भव्य शामियान्यात हा सोहळा झाला. नियोजित कार्यक्रमानुसार १०५ जोडपी विवाहबद्ध होणार होती. मात्र ९७ आदिवासी जोडपीच शनिवारी गडचिरोलीत पोहोचू शकली.
रविवारी सकाळी १०.३० वाजता पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार ही जोडपी विवाहबद्ध झाली. भुमकांनी (आदिवासी पुजारी) विधिवत हा समारंभ पार पाडला. यावेळी जिल्ह्याचे खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी शेखर सिंग, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, डॉ.हरी बालाजी, नगरसेवक प्रमोद पिपरे, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा.संजय भेंडे, सचिव प्रा.प्रमोद पेंडके, धर्मदाय सहआयुक्त प्रताप सातव, निरंजन वासेकर, सतीश आदमने, डॉ.शिवनाथ कुंभारे, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील १० उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या क्षेत्रनिहाय १० कप्पे करून त्या-त्या भागातील जोडप्यांना बसविण्यात आले होते. त्या प्रत्येक कप्प्यांमध्ये भूमकांसह स्वतंत्र पुजाविधीची सोय केली होती. त्यामुळे कुठेही गडबड गोंधळ झाला नाही. सर्व वºहाड्यांना कप्प्याबाहेर बसण्याची सोय केली होती. याशिवाय लग्नसोहळ्यानंतर जेवणासाठीही दुसºया शामियान्यात वºहाड्यांची तर वर-वधुंसाठी सभागृहात स्वतंत्र पंगत लावण्यात आली. त्यामुळे अतिशय कमी वेळात सर्व सोपस्कार निर्विघ्नपणे पार पडले.
संचालन प्रा.माधुरी यावलकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा.संजय भेंडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.प्रमोद पेंडके यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी मैत्री परिवार गडचिरोलीचे अनिल तिडके, घिसुलालजी काबरा, रमेश सारडा, सतीश पवार, किरण पवार, सुमिता मुनघाटे, नालंदा देशपांडे, प्रा.चंदनपाठ, अजय ठाकरे, सतीश त्रिनगरीवार, राजू चडगुलवार, राजू नेरकर, पंकज घोरमोडे, प्रदीप चुधरी, सुरज खोब्रागडे, किरण नैताम, तसेच मैत्री परिवार नागपूरचे मनिषा गर्गे, अर्चना कोट्टेवार, मनोज बंड, विजय जथे, सुहास खरे, मिलिंद देशकर, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त गंगाराम साखरकर, दिलीप ठाकरे, डॉ.पिनाक दंडे आदींनी सहकार्य केले.
मान्यवरांनी मांडले विचार
यावेळी खासदार अशोक नेते यांनी या नियोजनबद्ध सोहळ्याचे कौतुक केले. ज्यांना विवाहाचा खर्च झेपत नाही त्यांच्यासाठी अशा पद्धतीने विवाहबद्ध होण्याची संधी मिळणे हे त्यांचे भाग्यच आहे. अशा सोहळ्यांचे पुढेही आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी अशा सामूहिक विवाह सोहळ्यांची समाजाला गरज असल्याचे सांगून आयोजकांचे अभिनंदन केले. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाºया आणि त्यामुळे अधिकृत विवाहापासून वंचित राहणाºया आदिवासी समाजातील दाम्पत्याला यामुळे दिलासा मिळेल असे ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी या सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका मांडली. अशा सोहळ्यातून पोलीस आणि आदिवासी समाजातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न असून त्यांना संसार उभा करण्यासाठी काही भांडी आणि शासनाच्या निकषानुसार १० हजारांची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले.
मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी अशा प्रकारचे उपक्रम आपली संस्था नेहमीच घेत असते. परंतु गडचिरोलीसारख्या ठिकाणी एवढा भव्य सामूहिक विवाह सोहळा केवळ पोलिसांमुळे शक्य झाल्याचे सांगितले. यातील नवदाम्पत्यांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले.
चळवळ सोडल्यास ‘त्यांचा’ फायदाच
नक्षल चळवळीतून बाहेर पडल्यानंतर या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेले दीपक आणि छाया तथा रैनू आणि रूची हे दोन नक्षली दाम्पत्य समाधानी दिसत होते. नक्षल चळवळीत अनेक वर्षे कायम असुरक्षित जीवन जगताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आत्मसमर्पणानंतर पोलिसांकडून कोणतीही भिती किंवा त्रास नाही. दलममधील जीवनापेक्षा हे जीवन चांगले आहे हे सांगताना इतर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यास त्यांचा फायदाच आहे, असे दीपक व रैनू पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
३० ट्रॅक्टरमधून काढली वरात
दुपारी २ वाजताच्या सुमारास एका ट्रॅक्टरमध्ये ३ ते ४ जोडपी खुर्च्यांवर बसवून त्यांची फेरवरात काढण्यात आली. लग्न सोहळ्याचे ठिकाण ते इंदिरा गांधी चौक व पुन्हा लॉनपर्यंत ही वरात पोहोचल्यानंतर सायंकाळी सर्व जोडपी व वऱ्हाडांना रवाना करण्यात आले. यावेळी पोलीस बँडही लावण्यात आला होता. भर उन्हात ट्रॅक्टरमधून फिरताना या जोडप्यांना त्रास होत असला तरी त्यापेक्षा त्यांना होत असलेला आनंद जास्त असल्याचे जाणवत होते. ही वरात पुन्हा कार्यक्रमस्थळी आल्यानंतर नवदाम्पत्यांचे ओवाळून स्वागत करण्यात आले.