घोटपाडीत आदिवासींचा धार्मिक उत्सव
By admin | Published: May 12, 2016 01:35 AM2016-05-12T01:35:25+5:302016-05-12T01:35:25+5:30
घोटपाडी हे गाव भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागात वसलेले आहे.
भामरागड : तालुक्यातील घोटपाडी येथे ७ ते ९ मे दरम्यान आदिवासी समाजांचा पेन करसाड हा धार्मिक उत्सव मोठ्या आनंदात पार पडला.
घोटपाडी हे गाव भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागात वसलेले आहे. या गावात १०० टक्के बडा माडिया जमातीचे लोक वास्तव्य करतात. या ठिकाणी पुंगाटे गोत्राच्या ओंगले मातेचे वास्तव्य आहे. या गावात दर तीन वर्षांनी पेन करसाड हा धार्मिक उत्सव आयोजित करण्यात येते. पेन करसाड म्हणजे, कुलदैवतांच्या खेळण्याचा उत्सव होय, माडिया या आदिवासी जमातीत पेन करसाड उत्सवाला प्रचंड महत्त्व आहे. येथील आदिवासी अद्यापही पारंपरिक पेन करसाड हा उत्सव साजरा करतात. माडिया जमातीत कुल दैवतांच्या खेळण्याचा जल्लोष करण्याची पंरपंराही धार्मिक उत्सवातून अनादी काळापासून सुरू आहे. माडियांची धर्मकल्पना, देवकल्पना हे इतर धर्मापेक्षा भिन्न आहे. माडिया ही जमात पंचमहाभूतांना पुजतात. माडिया जमातीची सर्वोच्च शक्ती म्हणजे, सल्ले गांगरा होय. तिला बडापेन, सजोरपेन, पेरसापेन या नावाने माडिया आदिवासी जमातीचे लोक संबोधतात. घोटपाडी येथील पेन करसाड म्हणजे, कुलदैवतांच्या खेळण्याचा उत्सव घेण्यात आला. या कार्यक्रमात लगतचे १२ आंगादेव उपस्थित होते. तसेच या उत्सवात परिसरातील २०० गावातील नागरिक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)