पडियालजोबवासीयांनी केली सामूहिक तेरवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:28 PM2019-03-20T22:28:40+5:302019-03-20T22:29:04+5:30
तालुक्यातील मसेली भागातील पडियालजोब गावात ग्रामस्थांच्या पुढाकाराने पूर्वजांच्या तेरवीचा सामूहिक कार्यक्रम दि.१७ व १८ मार्चला घेण्यात आला. दरम्यान यावेळी आदिवासी परंपरेनुसार सर्व विधी पार पाडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील मसेली भागातील पडियालजोब गावात ग्रामस्थांच्या पुढाकाराने पूर्वजांच्या तेरवीचा सामूहिक कार्यक्रम दि.१७ व १८ मार्चला घेण्यात आला. दरम्यान यावेळी आदिवासी परंपरेनुसार सर्व विधी पार पाडण्यात आले.
पडियालजोब गावाने ग्रामसभेत याबाबतचा निर्णय घेतला होता. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील मृत्यू पावलेले आई-वडील व इतर पूर्वजांच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी अनेक दिवस लागतात. १२ परिवारातील तेरवीचा कार्यक्रम घ्यावयाचा होता.
एका परिवाराला कार्यक्रम म्हटला की, आदिवासी गोंडी परंपरेनुसार तीन दिवस लागतात. १२ परिवाराचे मिळून एकूण ३६ दिवस हा कार्यक्रम चालला असता. यात संबंधित कुटुंबीयांसह गावातील नागरिकांचा वेळ खर्च झाला असता, शिवाय आर्थिक झळही पोहोचली असती.
प्रत्येक कुटुंबाला हा खर्च करणे शक्य झाले नसते. त्यामुळे सर्व १२ परिवारातील पूर्वजांच्या तेरवीचा सामुहिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्वांचा मिळून एकूण खर्चाचा अंदाजीत आराखडा तयार करण्यात आला. पडियालजोगवासीयांनी या कार्यक्रमासाठी लागणारे धान्य गोळा केले.
तसेच काही रकमेची जुळवाजुळव केली. सदर कार्यक्रमाच्या कामाची जबाबदारी प्रत्येकाला निश्चित करून देण्यात आली. १७ मार्च रोजी आदिवासी परंपरेनुसार नृत्याच्या कार्यक्रम पार पडला. त्यानंतर १८ मार्चला गावात असलेल्या २० समाधीची स्वच्छता व रंगरंगोटीचे काम एका दिवसात करण्यात आले. त्यानंतर पारंपारिक पध्दतीने तेरवीचा सर्व विधी पार पाडण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमाला बाराही कुटुंबातील सगे, सोयरे, आप्तेष्ट व भुमक यांची लांबच्या लांब रांग लागली होती.
कोरची तालुक्यात सामुहिक पध्दतीने अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच पार पाडल्याने बाहेरगाववरून पाहुणे मंडळीची येथे गर्दी झाली होती. सायंकाळी ग्रामसभेमार्फत सामुहिक भोजनाचा कार्यक्रम पार पडला. सामुहिक कार्यक्रम घेतल्यामुळे पाहुण्याच्याही वेळ व पैशाची बचत झाली.