आदिवासी विद्यार्थ्यांनाही आता क्रीडा कौशल्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 01:23 AM2018-09-06T01:23:29+5:302018-09-06T01:24:07+5:30
राज्याच्या आदिवासीबहुल, दुर्गम भागातील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडाविषयक सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे क्षमता आणि कौशल्य असूनही त्यांची या क्षेत्रात प्रगती होऊ शकली नाही. मात्र आता प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या स्थानिक स्तरावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या आदिवासीबहुल, दुर्गम भागातील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडाविषयक सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे क्षमता आणि कौशल्य असूनही त्यांची या क्षेत्रात प्रगती होऊ शकली नाही. मात्र आता प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या स्थानिक स्तरावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या नियुक्त्या करण्यात गडचिरोली जिल्ह्याने विदर्भात आघाडी घेतली आहे.
१९७२ पासून राज्यात आदिवासी आश्रमशाळा कार्यरत आहेत. आदिवासी विकास विभागाकडून संचालित ५०० पेक्षा जास्त शासकीय आश्रमशाळांवर अजूनपर्यंत क्रीडा शिक्षक किंवा क्रीडा मार्गदर्शकाचे पद मंजूर नव्हते. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासाला वाव मिळत नव्हता. ही समस्या दूर करण्यासाठी शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रीडा शिक्षक किंवा मार्गदर्शक हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय यावर्षी राज्य शासनाने घेतला. त्यानुसार ६ मार्च २०१८ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये कंत्राटी क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीसाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी अध्यक्ष असलेल्या या समितीत जिल्हा क्रीडा अधिकारी आणि संबंधित प्रकल्प अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोली आणि अहेरीचे प्रकल्प अधिकारी असलेल्या डॉ.सचिन ओम्बासे यांनी क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीची प्रक्रिया करण्यात आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी आणि भामरागड या तीन प्रकल्पांमधील ४३ पैकी ४१ शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीचे आदेश तयार झाले
आहे. मासिक २५ हजार रुपये मानधनावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून गुरूवार दि.६ सप्टेंबरपासून ते क्रीडा मार्गदर्शक संबंधित आश्रमशाळांमध्ये रुजू होत आहे. तत्पूर्वी त्यांना २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर यादरम्यान गडचिरोली येथे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण देण्यात आले.
खासगी शाळांमधील विद्यार्थी वंचित
राज्यात जवळपास साडेपाचशे खासगी अनुदानित आश्रमशाळा आहेत. त्या आश्रमशाळांवर अद्यापही क्रीडा मार्गदर्शकाचे पद मंजूर नाही. त्यामुळे त्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखवण्याच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय आश्रमशाळांप्रमाणेच खासगी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठीही क्रीडा मार्गदर्शकाच्या नियुक्तीस मान्यता दिल्यास त्यांच्यातूनही राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही.