गडचिरोलीतील आदिवासींना स्त्रीभ्रूणहत्या माहीतच नाही; डॉ. प्रकाश आमटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:48 AM2018-01-22T10:48:56+5:302018-01-22T11:15:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हेमलकसात मी गेली ४५ वर्षे राहतो. तेथे बलात्काराच्या घटना अगदी कमी झाल्या आहेत. तेथील आदिवासी स्वाभिमानी आहेत. स्वत:च्या हिमतीवर जगतात. भारत सरकारने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी मोहीम सुरू केली, तेव्हा तेथील आदिवासींना स्त्रीभ्रूण हत्या म्हणजे काय, हेच माहीत नव्हते, परंतु शहरातील लोक स्त्रीभ्रूण हत्या करतात, हे ऐकून ते चकित झाले. यावरून त्यांची विचारशक्ती किती वेगळी आहे हे समजते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांनी केले.
पवई येथील आयआयटी बॉम्बेमध्ये ‘अभ्युदय’ कार्यक्रमात त्यांचे व्याख्यान झाले. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी मार्गदर्शन केले. आदिवासींवर माझा एवढा विश्वास आहे की, स्वत:च्या घराला आम्ही कधीच कुलूप लावत नाही, असेही प्रकाश आमटे यांनी सांगितले.
ज्येष्ठ समाजसेविका मंदाकिनी आमटे म्हणाल्या, हेमलकसामध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनचे मशिन सुरू करण्यात आले. तेथील महिलांना दीड रुपयात एक सॅनिटरी नॅपकिन दिला जातो, तसेच घरची परिस्थिती बेताची असलेल्यांना नॅपकिन मोफत दिले जातात.
आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. स्थानिक आदिवासींची भाषा पूर्णपणे वेगळी असल्याने, त्यांची भाषा शिकण्यास सुरुवातीला अडथळे निर्माण झाले.