रोजगारासाठी आदिवासींची पायपीट
By admin | Published: May 9, 2016 01:32 AM2016-05-09T01:32:38+5:302016-05-09T01:32:38+5:30
तालुकास्थळापासून ४० किमी अंतरावर असलेल्या लाहेरी भागातील बिनागुंडा परिसरात रस्तेच नाही.
बिनागुंडातील विदारक परिस्थिती : १२ किमी अंतर चढावी लागते पहाडी
भामरागड : तालुकास्थळापासून ४० किमी अंतरावर असलेल्या लाहेरी भागातील बिनागुंडा परिसरात रस्तेच नाही. त्यामुळे रोजगार तसेच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी येथील नागरिकांना सुमारे १२ किमी अंतरावरील पहाडी चढावी लागत आहे.
लाहेरीपासून बिनागुंडा हे गाव १८ किमी अंतरावर आहे. या बिनागुंडा गावाला पहाड व जंगलानी व्यापले आहे. या गावाला जाण्यासाठी अजुनपर्यंत रस्ता बनलेला नाही. दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी येथील नागरिकांना लाहेरी किंवा भामरागड येथे जावे लागते. रस्ताच नसल्याने वाहतुकीचे साधन असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. गावातील नागरिकांना पायदळच लाहेरी गाठावी लागते. बिनागुंडा भागात उच्च प्रतीचे झाडूचे गवत आहे. या गवताला जिल्हाभरात तसेच छत्तीसगड राज्यात मोठी मागणी आहे. झाडूच्या गवताचे गट्टे धरून नागरिक लाहेरीपर्यंत पायदळच येतात.
बिनागुंडा हे गाव पहाडीवर वसले आहे. त्यांची अडचण लक्षात घेऊन शासनाने या गावातील नागरिकांना लाहेरी येथे घराचे पट्टे देऊन पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे नागरिक लाहेरी येथे राहण्यास तयार नाही. पावसाळ्यामध्ये या गावाचा संपर्क तुटत असल्याने जून महिन्याच्या अगोदरच किमान चार महिने पुरतील एवढे साहित्य या गावातील नागरिक खरेदी करून ठेवतात. (तालुका प्रतिनिधी)