आदिवासींनी हक्कांसाठी लढा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 10:31 PM2017-12-23T22:31:14+5:302017-12-23T22:31:26+5:30
जल, जंगल व जमिनीवर आदिवासींची मालकी आहे. मात्र, भांडवलवादी व्यवस्थेत या मालकी हक्कावरच गदा आणण्याचे प्रयत्न होत आहे. त्यामुळे समस्त आदिवासी, दलित व बहुजनांनी एकत्र येऊन जल, जंगल व जमिनीसाठीचा संघर्ष बुलंद करावा, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जल, जंगल व जमिनीवर आदिवासींची मालकी आहे. मात्र, भांडवलवादी व्यवस्थेत या मालकी हक्कावरच गदा आणण्याचे प्रयत्न होत आहे. त्यामुळे समस्त आदिवासी, दलित व बहुजनांनी एकत्र येऊन जल, जंगल व जमिनीसाठीचा संघर्ष बुलंद करावा, असे आवाहन विविध वक्त्यांनी केले.
धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील आलकन्हार येथे ग्रामसभा आणि झाडापापडा पारंपरिक इलाका गोटूल समितीच्या वतीने राष्ट्रीय पेसा दिनानिमित्त गुरुवारी चर्चासत्र आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन होते, यावेळी उद्घाटनाच्या वेळी वक्त्यांनी संघर्षांचा सूर आळवला. या चर्चासत्राला ४० ग्रामसभांमधील नागरिक १२ पारपंरिक इलाक्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी झाडापापडा पारंपरिक इलाक्याचे मांझी तानूजी गावडे, आलकन्हारचे भूमिया राजू गावडे, काशिराम नरोटे, अलसू नरोटे, सोमजी करंगामी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सुरुवातीला गोंडी निसर्ग धर्माच्या झेंड्याचे पूजन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जि.प.सदस्य सैनू गोटा, अँड. लालसू नोगोटी, श्रीनिवास दुल्लमवार, भामरागड पं.स.सभापती सुकराम मडावी, पं.स.सदस्य शीला गोटा, रोशनी पवार, जयश्री वेळदा, रामदास जराते, छत्तीसगडच्या किरंगल परगण्याचे गोविंद वालको, लक्ष्मीकांत बोगामी, बावसू पावे उपस्थित होते.
गोविंद वालको यांनी पेसा कायद्याविषयी विस्तृत माहिती दिली. अॅड.लालसू नोगोटी व सैनू गोटा यांनी जल, जंगल व जमिनीवर मूळ निवासींचा अधिकार असून, त्यासाठी सर्वांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले. खाणीमुळे निसर्गाला धोका असून, पर्यावरणाचा ºहास होतो. त्यामुळे आपला खाणींना विरोध असल्याचेही ते म्हणाले. जि.प.सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनीही आदिवासी संस्कृती श्रेष्ठ असल्याचे सांगून पेसा कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली. कार्यक्रमासाठी बारसाय दुगा, वसंत पोटावी, देवू नरोटे, देवसाय आतला, मसरु तुलावी आदींनी सहकार्य केले.
पेसा कायदा आदिवासींच्या हिताचा
रामदास जराते यांनी काही लोक आदिवासींवर हिंदुत्व लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून हा प्रयत्न हाणून पाडावा, असे आवाहन केले. पेसा कायद्यामुळे गावे समृद्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ग्रामसभांच्या माध्यमातून गावाचा विकास करावा, असे आवाहन जराते यांनी केले. जयश्री वेळदा यांनी पेसा कायदा आदिवासींच्या हिताचा असून, प्रशासनाने या कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.